पुणे । दहशतवादी हल्ल्यांचे दिवसेंदिवस वाढते प्रमाण पाहता उदयोन्मुख पिढीला अशा हल्ल्यामागील वास्तविकता माहीत असणे गरजेचे आहे. या पिढीला विद्यार्थी दशेतच हे वास्तव समजणे व दहशतवादामुळे उद्भवणार्या समस्येबाबतीत जागरूक करणे हितावह ठरते. मुंबईत झालेला 26/11 चा हल्ला ऐतिहासिक घटना आहे. देशासाठी शहीद झालेले पोलीस कर्मचारी व त्यांनी केलेल्या धाडसी कार्याची माहिती या पिढीला होणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून बालवयातच देशभक्तीची भावना मुलांच्या मनात रुजविता येईल. म्हणून 26/11 च्या घटनेचा पाठ्यपुस्तकात समावेश करावा, अशी मागणी महाराष्ट राज्य पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते यांनी केली आहे.
याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षण मंत्री विनोद तावडे, पालक मंत्री गिरीश बापट यांच्याकडे या संघटनेने निवेदन केले होते. संघटनेने पाठपुरावा केला असता शासनाने संबंधी कार्यवाहीचे आदेश दिले आहेत असे कळते. तरी संबंधित प्रकरणाची दखल घेत पाठ्यपुस्तकात तातडीने समावेश करावा असे कपोते यांनी
म्हटले आहे.
मुंबईत झालेल्या या हल्ल्यात हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामते, उन्नीकृष्णन आदी अधिकारी प्राणास मुकले आहेत. महाराष्ट्र पोलिसची ही मोठी कामगिरी होती. विद्यार्थी दशेतच जागरूकता येण्यासाठी पाठ्यपुस्तकात या घटनेचा समावेश करणे आवश्यक आहे. म्हणून पाठ्यपुस्तकात 26/11चा हल्ला, हल्ल्यावरील विजय या घटनेचा समावेश करावा असे कपोते यांनी निवेदनात म्हटले आहे. दरम्यान पोलीस मित्र संघटनेतर्फे हल्ल्यातील शहिदांना शहरात ठिकठिकाणी श्रद्धांजली वाहण्यात आली.