रावेर- तालुक्यातील पाडला खुर्द येथे तीन दिवसांपासून गावात एक माकड दाखल झाले मात्र प्रकृती खालावलेल्या या माकडाचा अचानक मृत्यू झाल्याने ग्रामस्थही हळहळले. ग्रामस्थांनी माणुसकी धर्म जोपासत या माकडावर अंत्यसंस्कार केले. गावातील महेंद्र पाटील व ईश्वर चौधरी यांनी मृत माकडाला ग्रामपंचायत चौकातील अंगणवाडीजवळ आणले. मृत माणसावर ज्या पद्धत्तीने अंत्यविधी केला जातो त्या पद्धत्तीनेच मृत माकाडावरही धार्मिक पद्धतीने अंत्यविधी करण्याचा ग्रामस्थांनी निर्णय घेतला.
लोकवर्गणीतून केला विधीवत अंत्यविधी
माकडाच्या अंत्यविधीसाठी वर्गणी गोळा करण्यात आली. पन्नालाल चौधरी, गणेश चौधरी यांनी बर्हाणपूर येथे अंत्यसंस्काराचे साहित्य आले तर ग्रामथसंनी फुलांनी तिरडी सजवली. माकडाच्या विधीवत अंघोळीनंतर नवीन कपड्यात गुंडाळून आरती करण्यात आली. त्यासाठी सर्व जाती-धर्मातील लोक उपस्थित होते. चंद्रकांत चौधरी, ईश्वर चौधरी, पन्नालाल पाटील, कपिल पाटील या चार जणांनी खांदा देत माकडाचा मृतदेह स्मशानभूमीत नेला. लीलाधर राणे यांचे मुंडण करून मुखाग्नी दिला. सरपंच जानकीराम चौधरी, पोलीस पाटील, डॉ.किशोर चौधरी, सुरेश अटकाळे, जीवन पाटील, सोपान पाटील, सुनील बाणाईत, सचिन झाल्टे आदींची उपस्थिती होती.