पाडळसरेच्या निम्न तापी प्रकल्पाचे काम रखडले

0

मुंबई। खान्देशातील महत्वाचा मानला जाणारा निम्न तापी पाडळसरे प्रकल्पाचे काम निधीअभावी रखडले आहे. खान्देशातील जळगाव व धुळे जिल्ह्यांना वरदान असलेला हा प्रकल्प निधीअभावी रखडल्याने माजी आमदार साहेबराव पाटील यांनी पंतप्रधान कार्यालयाला (पीएमओ) याबाबत पत्र लिहिले होते. पीएमओ कार्यालयाने ह्या पत्राची दखल घेतली असून याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाला पत्र पाठविले आहे. यानंतर खडबडून जागे झालेल्या मुख्यमंत्री कार्यालयाने याबाबत जलसंपदा विभागाकडे पत्रव्यवहार केला असून तापी महामंडळाला विभागाने विचारणा केली आहे.

जळगावसह धुळे जिल्ह्याला नवसंजीवनी मिळणार
निम्न तापी प्रकल्प पूर्ण झाल्यास तालुक्यासह जळगाव आणि धुळे जिल्ह्याला देखील नवसंजीवनी मिळणार आहे. मात्र निम्न तापी प्रकल्प, पाडळसे धरणाचे काम निधी अभावी रखडले आहे. याबाबत अमळनेरचे माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी वारंवार पाठपुरावा केला असून धरणासाठी व पुनर्वसनासाठी निधी मागणीचे निवेदने दिली आहेत. यासंदर्भात त्यांनी 24 मे 2017 रोजी पीएमओ कार्यालयास पत्र लिहून प्रकल्पाचे कामबंद व अपुर्‍या निधीबाबत कळवून कामाला गती देण्याबाबत विनंती केली होती. याची दखल घेत पीएमओ कार्यालयाच्या डायरेक्टरकडून 16 जून रोजी मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिवांना पत्र लिहून कळविले होते. याची तत्काळ दखल घेत मुख्यमंत्री कार्यालयाकडून जलसंपदा विभाग व तिथून तापी महामंडळाला पत्र लिहून यासंबंधी विचारणा केली आहे.

हा प्रकल्प खानदेशासाठी अतिशय महत्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या कामाला गती यावी यासाठी मी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. मात्र तरीही निधीच्या अभावी काम रखडले आहे. सरकारने प्रकल्पाला निधी देऊन तात्काळ काम पूर्ण करावे.
साहेबराव पाटील, माजी आमदार