अमळनेर– जामनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत माझी पत्नी उमेदवार असल्याने मी आज मोर्चेकर्यांना प्रत्यक्ष येऊन भेटू शकलो नाही’. या जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या प्रतिक्रियेमुळे पाडळसरे जनआंदोलन विराट मूक मोर्चातील मोर्चेकर्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी कोणतेही ठोस आश्वासन न देता मोघम उत्तर दिल्याने हजारोंच्या जनसमुदायाचा भ्रमनिरास झाला.
पाडळसरे धरणासाठी आज पाडळसरे धरण जन आंदोलन समितीतर्फे भव्य मुकमोर्चा काढण्यात आला होता. यात तब्बल 8 हजाराहुन अधिक महिला पुरुष सहभागी झाले होते. आता ही समिती वाट पाहणार नसून केवळ चार महिन्यात काम सुरू होण्याची आशा ठेवत आहे. अन्यथा चार महिन्यात आमरण उपोषण सुरु करण्याचा इशारा समितीतर्फे देण्यात आला आहे. जलसंपदामंत्री असलेल्या जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाकांक्षी व पाच तालुक्यांचा पाणी प्रश्न सोडविणार्या प्रकल्पाच्या अपूर्णतेबाबत जनतेत असलेला असंतोष आज उफाळून रस्त्यावर आला होता. आमदार स्मिता वाघ, आमदार शिरीष चौधरी यांनी स्वतः या मोर्चात सहभाग नोंदविला. दरम्यान, जलसंपदामंत्र्यांच्या प्रतिक्रियेमुळे 5 तालुक्यांचा जीवनमरणाचा प्रश्न असलेल्या सार्वजनिक आंदोलन पेक्षा निवडणुकीचे जलसंपदा मंत्र्यांना अधिक महत्त्व असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी उमटल्या.