निवेदनासोबत प्रशासनाला दिली भिकेची रक्कम; आंदोलनात नागरिकांचा सहभाग
धरणाकसाठी शासनाकडे निधी नसल्याने आंदोलन समितीतर्फे निषेध
अमळनेर- निधीअभावी पाडळसरे धरणाचे काम रखडले असून शासनाकडे पाडळसरे धरणपूर्ण करण्यासाठी पैसा नाही, या निषेधार्थ शासनाला निधी देण्यासाठी आंदोलन समितीच्यावतीने भीक मांगो आंदोलन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून आंदोलनकर्त्यांनी भीक मागायची झोळी फिरवत आंदोलनास सुरवात केली. या आंदोलनात सर्वसामान्यांसह व्यापारी, भाजी, फळ विक्रेते, गोर गरीब महिला, तरुण, तरुणी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. 9 हजार 719 रुपये 50पैसे इतकी जमलेली भीक आंदोलनकर्त्यांनी तहसीलदार प्रदिप पाटील यांना निवेदनासोबत देऊ केली. तहसीलदार यांनी केवळ निवदेन स्वीकारले.
आश्वासनांची पूर्तता नाही
तालुक्यासह परिसरासाठी संजिवनी ठरणारे पाडळसरे धरण शासनाच्या दुर्लक्षामुळे, निधी अभावी अपूर्णावस्थेत पडलेले आहे. धरण पूर्तीच्या मागणीसाठी 5 एप्रिल रोजी अमळनेरकर उत्स्फूर्त पणे प्रचंड मोर्चाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरले होते. यावेळी मोर्चेकर्यांच्या मागण्यांबाबत जलसंपदा मंत्री ना.गिरिषभाऊ महाजन यांनी दूरध्वनी हुन आश्वासन देत शासन स्तरातून धरण पूर्ण करण्यासाठी तातडीने प्रयत्न करण्यात येईल, महिन्याभरात बैठक आयोजित करण्याचे व शासनाच्या योजनेतून निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे जाहीर आश्वासन दिले होते.मात्र अनेक महिने लोटले तरी कोणतीही कार्यवाही झाली नाही याचा निषेध करणयात आला.
शासन उदासीन
नुकतेच राज्यातील अनेक धरणांसाठी शासनाने निधी जाहिरपणे उपलब्ध करून दिला मात्र पाडळसरे धरणाबाबत खोटे आश्वासन देवून मोर्चे कर्यांच्या तोंडाला पाने पुसली, असे स्पष्ट झाले असल्याचे सांगत तालुक्यातील जनतेत संताप व्यक्त करण्यात आला. धरणाबाबतच्या शासनाच्या उदासीनतेचा निषेध आजच्या भीक मागो आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आला.
कचेरीतच मोजली भीक
गूळ बाजार, दगडी दरवाजा, सराफ बाजार, कुंटे रोड, फळ बाजार, लालबाग शॉपिंग, महाराष्ट्र् बँक, भाजी बाजार, सुभाष चौक, नगर पालिका शॉपिंग, अंबर हॉटेल, जिल्हा बँक, बसस्टँड, धुळे रोड, विजय मारुती, विश्राम गृह, बळीराजा स्मारकमार्गे प्रांताधिकारी कार्यालयावर भीक गोळा करीत आंदोलन कर्ते पोहचले. पाडळसरे धरणास निधी मिळालाच पाहिजे, धरण पूर्ण झालेच पाहिजे च्या घोषणा देत ,भीक मागण्यांचे गाणे वाद्यवृंदासह वाजवत भीक मांगो कार्यक्रम लक्ष वेधक ठरला. कचेरी आवारात धरणासाठी भीक द्या हो भीक द्या गाणे टाळ वाजवीत ढोलक वाद्यांच्यासाथीने सामूहिक पणे म्हणण्यात आले. गोळा करण्यात आलेली भीक कचेरी आवारातच आंदोलन कर्त्यांच्या वतीने मोजण्यात आली.
उपोषणाचा इशारा
आंदोलनकर्ते सुभाष चौधरी, शिवाजी पाटील, सुनिल पवार, देविदास दिसले, प्रशांत भदाणे, रणजित शिंदे, योगेश पाटील, नावेद शेख, गुलाम नबी यांनी जमलेली भीक शासनासाठी गोळा केली असल्याने तहसीलदार यांनी स्वीकारावी असा आग्रह धरला. मात्र तहसीलदार यांनी नम्रपणे या भिकेचा निधी स्वीकारण्यास असमर्थता दर्शविली. हा निधी अखेर मुख्यमंत्री निधीत सादर करण्याचे ठरले. भीक मांगो इशारा आंदोलनाची दखल शासनाने न घेतल्यास यापुढे पाडळसरे धरण आंदोलन समितीतर्फे आमरण उपोषणाचे आंदोलन उभारण्यात येईल, असे समितीने यावेळी जाहीर केले.
यांची होती उपस्थिती
निवेदन देतांना समितीचे अध्यक्ष सुभाष चौधरी, शिवाजी पाटील, देविदास देसले, डी. एम.पाटील, सुनिल पवार, पुरुषोत्तम शेटे, प्रशांत भदाणे, रणजित शिंदे, अॅड.रज्जाक शेख, रामराव पवार, सतिष काटे, अजय पाटील, रवी पाटील, गुलाम नबी, नावेद शेख, आदिउपस्थित होते तर आंदोलनात हिंमत पाटील, नगरसेवक सलिम टोपी, वसंत पाटील, रोहन मुंदडा,हिंमत देसले, रियाजिद्दीन शेख,विनोद पाटील, नरेंद्र पाटील, किरण पारधी, प्रविण माळी, प्रशांत पाटील, सचिन जैन, आप्पा पारधी, प्रदीप पाटील, जगन्नाथ पाटील, मसूद खा रशिद खान, राजू महाराज, अंबादास पाटील आदिंसह मोठ्या संख्येने आंदोलनकर्ते सहभागी होते. निवेदनावर भारती गाला, डॉ.अपर्णा मुठ्ठे, मिलिंद डेरे, प्रविण माळी आदिंसह अनेकांच्या स्वाक्षर्या होत्या.