पाडळसरे प्रकल्पग्रस्तांचे आमरण उपोषण सुरुच

0

कळमसरे । तापी नदीवर पाडळसरे येथे साकारण्यात येत असलेल्या निम्न तापी पाडळसरे धरणामुळे शंभर टक्के विस्थापित होणारे पहिल्याच पाडळसरे गावातील प्रकल्पग्रस्त कुटुंबांचे भूसंपादन प्रस्ताव 113/04 मधील गृहसंपादनाचा मोबदला ग्रामपंचायत दप्तरातील नमुना नंबर 8 नुसार मिळावा म्हणून शासनाने दखल घेण्यासाठी पाडळसरे येथील गोपीचंद उत्तम पाटील, यशोदाबाई काशिनाथ पाटील, ज्ञानेश्‍वर काशिनाथ पाटील, नंदा रमेश पाटील, लक्ष्मण सुखदेव पाटील आदी प्रकल्पग्रस्तांनी काल पाडळसरे जुने गावठाणातील ग्रामपंचायत कार्यालयास कुलुप ठोकून मोबदला मिळत नाही तो पर्यंत ग्रामपंचायत समोर आमरण उपोषणस सुरूवात केली आहे. मात्र दुसर्‍या दिवशी कुठलाच अधिकारी फिरकला नसल्याने उपोषण कर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ग्रा.पं.कार्यालयाचे दुसर्‍या दिवशीही कामकाज बंद होते. मात्र शासकीय भूसंपादनाचा मोबदला मिळत नसल्याने संताप व्रक्त होत होता.

ग्रामस्थानी घेतली प्रांतअधिकारी यांची भेट
दरम्यान गावातील उपोषणार्थी यांना दुसर्‍या दिवशीही कुणीही भेटायला न आल्याने सायंकाळी अमळनेर येथे प्रांताधिकारी संजय गायकवाड यांनी माजी आमदार साहेबराव पाटील, उपकार्यकारी अभियंता व्ही.एस.ठाकुर, पाडळसरे येथील पुनर्वसन समितीचे अध्यक्ष भागवत पाटील, वसंतराव पाटील, भूषण पाटील, उपोषणकर्त्यांची माहिती जाणून घेत जळगाव येथे भूसंपादन अधिकारी श्री सुलाने यांच्याशी भ्रमणध्वनिवर संपर्क साधुन भूसंपादन मोबदलविषयी माहिती जाणून घेतली असता भूसंम्पादन अधिकारी यानी यावेळी सांगितले की, उपोषणकर्त्यानी जळगाव कार्यालयात येऊन चर्चा करावी. ज्याप्रमाणे नियमानुसार भूसंपादनाचा मोबदला नियमानुसार वाटप करण्यात आला आहे. मात्र उपोषणार्थीमध्ये यशोदाबाई पाटील, गोपीचंद पाटील यांची प्रकृती खालावल्याने वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत कुलकर्णी यानी प्राथमिक उपचार करीत पुढील उपचारासाठी अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले आहे.