पाडळसरे प्रकल्पासाठी भरीव निधी द्या

0

अमळनेर : निम्न तापी प्रकल्प पाडळसे या प्रकल्पाच्या कामासाठी आवश्यक ती आर्थिक तरतूद उपलब्धतेसाठी प्रजाकसत्ताक दिनी गुरूवार 26 जानेवारी 2017 रोजी प्रकल्पस्थळी जल सत्याग्रह करण्याचा इशारा माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी लेखी पत्राद्वारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. या निवेदनाच्या प्रती जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, राज्यमंत्री विजय शिवतारे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, धनंजय मुंडे, अजित पवार, एकनाथराव खडसे यांना देण्यात आले आहे.

शेतकर्‍यांमध्ये असंतोषाची भावना
सतत अवर्षण प्रवण क्षेत्र असलेल्या निम्न तापी प्रकल्प पाडळसे या प्रकल्पाच्या कामाला तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने मार्च 2015 अखेर 356.74 कोटी रूपये आवश्यक निधीची तरतूद करुन तापी नदीच्या तलांक 132.51 मीटरवरुन सांडवा बांधकाम मूर्धा पातळी तलांक 139.24 मीटर पर्यंत झालेले असून 17 किमीपर्यंत बॅकवाटर असून 12.97 दलघमी मृत पाणीसाठा झालेला आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षापासून तटपूंजी निधी तरतुदीमुळे प्रकल्पाचे काम बंद असल्याने शेतकर्‍यांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे.

दरसूचिनुसार तरतूद करा
या प्रकल्पाच्या कामासाठी 8 उपसा सिंचन योजनेच्या प्रस्तावासह सन 2008-09 च्या दर सूची नुसार 2623.40 कोटी किमतीस सन 2016-17 च्या दरसूचीनुसार बोदवड उपसा सिंचन योजनेच्या धर्तीवर आवश्यक आर्थिक निधीची तरतूद करावी. धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील 22 राज्यस्तर सहकारी उपसा सिंचन योजनेच्या धर्तीवर साने गुरूजी सहकारी उपसा सिंचन योजना तालुक्यातीली बोहरा येथील योजनेच्या 295.45 लक्ष किमतीच्या प्रलंबित प्रस्तवास प्रायोगिक तत्वावर पुनस्थापना व दुरुस्तीच्या कामास प्रशासकीय मान्यता द्यावी, तापी नदी व पांझरा नदीचे संगमावर पुरातन कपिलेश्वर मंदिरालगत सरक्षणात्मक उपाय योजनेसाठी भूस्तर चाचणी कामाच्या कार्यवाहिस गती देवुन आवश्यक 4 कोटी रुपये प्रस्तावास मान्यता द्यावी आणि निम मांजरोद पुल 40 कोटी रुपयांच्या कामास नियामक मंडळाच्या मान्यतेच्या प्रलंबित कामाच्या निविदा प्रक्रियेस चालना द्यावी अशा चार मागण्याची मागणी माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी केली आहे.