15 एकरावर मंडपाची उभारणी ; आठवे अधिवेशन -कुटुंबनायक रमेश विठू पाटील
भुसावळ– तब्बल 34 वर्षानंतर लेवा समाजाचे पाडळसे येथे अधिवेशन होत असून 15 एकर जागेवर मंडपाची उभारणी सुरू असून देशभरासह परदेशातील समाजबांधव या अधिवेशनाला हजेरी लावतील, असा आशावाद भोरगाव लेवा पंचायतीचे कुटुंबनायक रमेश विठू पाटील यांनी व्यक्त केला. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जनशक्ती प्रतिनिधीने त्यांच्याशी संवाद साधला. कुटुंब नायक म्हणाले की, सुमारे 60 हजारांवर समाजबांधव या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. समाजातील अनिष्ट रूढी-परंपरा बंद व्हाव्यात, नवघरे-बाराघरे वाद मिटावा यासह अन्य महत्त्वपूर्ण ठराव अधिवेशनात पारीत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कुटुंब नायकांचा होणार सन्मान
लेवा समाजाची धूरा तब्बल 51 वर्षांपासून यशस्वीपणे सांभाळणार्या कुटुंब नायक रमेश विठू पाटील यांचा याप्रसंगी विशेष सत्कार करण्यात येणार आहे. लेवा समाजातील कौटुंबिक कलह मिटवून अनेकांचे संसार पूर्वपदावर आणण्यात मोलाची भूमिका कुटुंब नायकांनी निभावली आहे तर यासाठी त्यांच्यासोबत काम करणार्या निवडक तीन सहकार्यांचाही प्रसंगी सन्मान करण्यात येईल. लेवा समाजातील तरुण-तरुणींनी आयपीएस, आयएएस तसेच विविध परीक्षेत मिळवलेल्या उल्लेखनीय यशानंतर त्यांचाही प्रसंगी सन्मान करण्यात येईल.
या समाजबांधवांचे विशेष परीश्रम
अधिवेशनासाठी अॅड.संजय राणे, प्रभात चौधरी, भरत महाजन, देवा वाणी, पुरूषोत्तम नारखेडे, विकास पाचपांडे, प्रमोद नेमाडे, सुनील खडके, चंदन महाजन, गिरीश नारखेडे, पाडळसा उपसरपंच राहुल पाटील, विजय पाटील, डॉ.उदय चौधरी, जयंत पाटील, देवेंद्र पाटील, निखील पाटील, गणेश पाटील, विलास पाटील, नामदेव बर्हाटे, राकेश बर्हाटे, विजय पाटील, संदीप बर्हाटे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते परीश्रम घेत आहेत.
विविध ठराव पारीत होणार
महाअधिवेशनात विविध ठराव पारीत करण्यात येतील. त्याचे पालन करण्याची जबाबदारी समाज पंच कमेटीची राहील. बेरोजगार तरुणांसाठी रोजगार मेळावा घेण्याचा मानस असून शेतीनिष्ठ तरुणांसाठी तज्ज्ञांच्या उपस्थितीत कार्यशाळा घेऊ व त्यासाठी लागणारा खर्च हा भोरगाव लेवा पंचायतीतर्फे करण्यात असल्याचे कुटुंब नायक रमेश विठू पाटील म्हणाले.
समाज एकसंघ राहणार
महाअधिवेशनाच्या माध्यमातून समाज एकसंघ राहण्यासाठी मोठी मदत होणार आहे. सर्वच पोट जाती या निमित्ताने एकाच छताखाली येणार आहेत. समाज संघटन ही काळाची गरज आहे. अनिष्ट रूढी-परंपरा बंद करण्यासंदर्भात अधिवेशनात ठराव करण्यात येतील. समाजबांधवांनी आवर्जून या अधिवेशनाला उपस्थिती द्यावी व कुटुंब नायकांनी दिलेल्या आदेशाचे पालन करावे, असे महाअधिवेशन समिती प्रमुख विष्णू भंगाळे म्हणाले.