मुंबई । जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील पाडळसे येथील निम्न तापी प्रकल्पाच्या अवर्षण प्रवण क्षेत्रात सिंचन सुविधा मिळावी, यासाठी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. खानदेशात अनेक प्रकल्प रखडले असतांना केवळ जळगाव जिल्ह्यातील ठराविक प्रकल्पाच्या निधीलाच मंजुरी मिळाल्याने बाकीच्या प्रकल्पाचे काय होणार? याकडे मात्र लक्ष लागून आहे. तापी खोरे महामंडळाच्या अखत्यारीतील जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्हयातील अपूर्ण सिंचन प्रकल्पासाठी तब्बल 31 हजार 395 कोटी रूपयांची आवश्यकता आहे. प्रत्येक वर्षाच्या अर्थसंकल्पात सिंचनासाठी केवळ 8 हजार कोटींच्या आसपास तरतूद होत असताना हा निधी जमविण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची कसोटी लागणार आहे.
१६६ प्रकल्पांच्या निधीचे काय?
राज्यातील सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी राजपालांच्या निर्देशानुसार निधीचे वाटप करण्याचे धोरण आहे. राज्यसरकारचा वैदर्भिय चेहरा असल्याने सिंचनाचा अधिक निधि विदर्भाकडे वळविला जात आहे. यासाठीच राज्यसरकारने विदर्भातील बहुतांश प्रकल्पांना सुधारीत प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे तापी खोर्यातील प्रकल्पांसाठी तब्बल 31 हजार 395 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करताना गिरीश महाजन यांची कसोटी लागणार आहे. तापी खोरे महामंडळाच्या अखत्यारीत 234 प्रकल्प असून त्यापैकी फक्त 68 प्रकल्पांची सिंचन क्षमता 75 ते 100 टक्यांवर आहे. उर्वरित प्रकल्प निधी अभावी रखडले आहेत. रखडलेल्या कामात प्रामुख्याने कावले निर्माण करणे,धरण सुरक्षा, पाणी मोजणी यंत्रणा बसविणे आदि कामे प्रलंबित आहेत. तापी खोरे महामंडळाअंतर्गत जळगाव जिल्ह्यात 71, धुळे जिल्ह्यात 105, नंदूरबार जिल्ह्यात 58 असे एकूण २३४ प्रकल्प आहेत. यातील केवळ ६८ प्रकल्पांची स्थिती चांगली असून बाकीचे प्रकल्प रखडले आहेत. या उर्वरित १६६ प्रकल्पांना उर्जितावस्था कधी मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
पाडळसे साठी तत्त्वतः 621.68 कोटी!
-अमळनेर तालुक्यातील पाडळसे येथील निम्न तापी प्रकल्पाच्या क्षेत्रात पाच उपसा सिंचन योजना शासकीय खर्चाने राबविण्याच्या सुमारे 621.68 कोटी रुपयाच्या प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वत: मान्यता दिली आहे. यामुळे अमळनेर, धरणगाव व चोपडा तालुक्यातील सुमारे वीस हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे. तापी नदीवर मौजे पाडळसे गावाजवळ निम्न तापी प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पामुळे 502.09 दलघमी एवढा पाणी साठा होणार असून 63 हजार 565 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. केंद्रीय जल आयोगानेही या क्षेत्रात उपसा सिंचन योजनेद्वारे पाणी पुरविण्यासाठी मंजुरी दिली होती. जलसंपदा मंत्री महाजन यांच्या पाठपुराव्यानंतर या पाच उपसा सिंचन योजनेच्या 621.68 कोटी इतक्या प्रस्तावास मुख्यमंत्री फडणवीस यांनी तत्वत: मंजुरी दिली असून या योजनांमध्ये ऊर्जा कार्यक्षम पंप वापरण्याची सूचना केली आहे. मात्र यामध्ये तत्त्वतः हा शब्द आल्याने पुन्हा गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. या योजनेमुळे प्रामुख्याने अमळनेर, धरणगाव, चोपडा या अवर्षण प्रवण क्षेत्रातील 20 हजार हेक्टर क्षेत्रास सिंचन सुविधेचा लाभ होणार आहे. निम्न तापी प्रकल्प येत्या तीन वर्षात पूर्ण करण्यात येणार असून त्यावेळी या सिंचन योजनेचा शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे महाजन यांनी यावेळी सांगितले.