पाडळसे येथील बेपत्ता शिक्षकाचा मृतदेह तापी नदीपात्रात आढळला

The body Of A Missing Teacher From Padalse Was Found In Tapi Riverbed यावल : तालुक्यातील पाडळसे येथून तीन दिवसांपासून बेपत्ता झालेल्या 37 वर्षीय शिक्षकाचा मृतदेह अंजाळे शिवारातील तापी नदी पात्रात आढळल्याने खळबळ उडाली आहे. दीपक दिनकर भारंबे (37, दत्तवाडी, जळगाव) असे मयताचे नाव आहे. शिक्षकाने आत्महत्या केली की घातपात झाला? याबाबतची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे.

अस्वस्थ असल्याचे सांगत कट केला फोन
पाडळसे, ता.यावल येथील मूळचे रहिवासी व हल्ली जळगाव शहरात दत्त वाडीतील रहिवासी तथा जळगावच्या युवा विकास फाऊंडेशन संचलित निमखेडी शिवारातील खोटेनगर जळगाव शाळेत शिक्षक असलेले दीपक भारंबे हे पाडळसे-जळगाव येथे दररोज ये-जा करीत होते मात्र गुरुवार, 18 ऑगस्ट रोजी पाडळसे येथून जळगाव शाळेमध्ये जाण्यासाठी निघाले असता ते शाळेत पोहोचलेच नाही. घरी आई-वडीलांना मोबाईल वरून कॉल करून सांगितले की, आपण खूपच अस्वस्थ आहोत व नंतर फोन बंद केला. दोन दिवसांनी हा मोबाईल कासवा येथील एका बकर्‍या चारणार्‍या व्यक्तीस मिळाला व त्याने तो पाडळसे येथे आणुन दिला. त्यानंतर तीन दिवसांपासून बेपत्ता या शिक्षकाचा मृतदेह शनिवारी सकाळी अंजाळे जवळील तापी नदी पात्राच्या काठी जुन्या पाईप फॅक्टरी या जवळ असलेल्या श्री दत्त मंदिराच्या पायथ्याजवळ दिसून आला.

यावल पोलिसांनी केला पंचनामा
याबाबत तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी यावलचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक विनोद गोसावी, हवालदार किशोर परदेशी, संदीप सूर्यवंशी हे दाखल झाले व त्यांनी तातडीने घटनास्थळाचा पंचनामा केला व जागेवरच मृतदेहाचे शवविच्छेदन यावल ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. जिशान खान व पथकाकडून करण्यात आले. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात पोलीस पाटील सुरेश खैरनार यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत शिक्षकाच्या पश्चात पाडळसे येथे आई-वडील, पत्नी मुलगा, मुलगी असा परीवार आहे.