रावेर : तालुक्यातील पाडळे खुर्द शेत-शिवार चराईसाठी गेलेल्या गाईला बिबट्याने फस्त केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी सायंकाळी घडली. या घटनेने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आधीच रावेरात हिंस्त्र प्राण्याचा धुमाकूळ वनविभागाकडून थांबत नसतानाच पाडळे खुर्द येथे बिबट्याचा धुमाकुळ वाढल्याने वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
गायीचा पाडला फडशा
पाडळे खुर्द (ता.रावेर) येथील रहिवासी हबीब तडवी यांची पाळीव गाय जंगलात चराईसाठी गेली असता दोन दिवसांपूर्वी बिबट्याने अचानक हल्ला चढवत गायीचा फडशा पाडला. बुधवारी दिवसभर गायीचा शोध घेतल्यानंतर ती मृतावस्थेत आढळली. पंचायत समिती सदस्य जुम्मा तडवी यांनी घटनास्थळी भेट दिली व पगमार्ग बघितले असता हल्ला करणारा प्राणी बिबट असल्याचे सांगण्यात आले. यापूर्वी या भागात एक कुत्रा व शेळीवरदेखील हल्ला करून त्यंना फस्त करण्यात आले होते. या घटनेची माहिती मिळताच गुरुवारी सकाळी वनपाल अतुल तायडे पाडळे खुर्द येथे रवाना झाले.
रावेरातील हिंस्त्र प्राण्याचा अजुन थांग-पत्ता लागेना
रावेरात धुमाकुळ घालुन सुमारे 40 शेळ्या फस्त करणारा हिंस्त्र प्राण्याचा वन विभागाला अजूनही थांग-पत्ता लागलेला नाही. शहरात वन विभागाने गस्त जरी वाढवली असली तरी हिंस्त्र प्राण्याची दहशत रावेरात मात्र कायम आहे.