पाडवा रॅलीमध्ये लोणावळेकारांचा उत्स्फूर्त सहभाग

0

लोणावळा :हिंदू समिती, मावळ यांच्या वतीने हिंदू नववर्षाच्या स्वागतार्थ लोणावळ्यात आयोजित करण्यात आलेल्या पाडवा रॅलीमध्ये लोणावळेकारांसह आजूबाजूच्या ग्रामीण भागातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. सुमारे चार हजाराहून अधिक दुचाकींवरून हजारोच्या संख्येने नागरिक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

लोणावळा शहरात दरवर्षी गुढी पाडव्याला हिंदू नववर्षाच्या स्वागतार्थ हिंदू समितीच्या वतीने भव्य अशा रॅलीचे आयोजन करण्यात येते. मागील काही वर्षापासून केवळ लोणावळा शहरापुरती मर्यादित असलेली ही रॅली मागील वर्षापासून लोणावळा शहरालगत असणार्‍या ग्रामीण परिसरामध्येही नेण्यात येते आणि त्या ठिकाणी या रॅलीचा समारोप करण्यात येतो. यामुळे लोणावळेकारांसोबतच आजूबाजूच्या ग्रामीण परिसरातील युवक युवतींनीही रॅलीमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवित असतात.

सुरेखा जाधव रॅलीमध्ये दुचाकीवरून सहभागी
यंदा सदर रॅली पुरंदरे विद्यालय, लोणावळा या पटांगणातून सुरू करण्यात आलेली रॅली बाजारपेठ, गवळीवाडा नाका, खंडाळा, तुंगार्ली, वलवण, वरसोली, वाकसाई ते पुढे कार्ला या मार्गे नेहण्यात आली. शेवटी वेहेरगावात रॅलीचा समारोप करण्यात आला. लोणावळ्याच्या प्रथम नागरिक सुरेखा जाधव रॅलीमध्ये आपल्या दुचाकीवरून सहभागी झाल्या होत्या. त्यांच्या शिवाय सर्व पक्षाचे, संघटनाचे आजीमाजी पदाधिकारी, नगरसेवक, ग्रामीण परिसरातील आजीमाजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जेष्ठ नागरिक, महिला, युवक, युवती लहान मुले, मुली यांनी रॅलीमध्ये मोठ्या संख्येने आपल्या पालकांच्या, मित्रांच्या दुचाकींवरून सहभाग घेतला होता.

संपूर्ण रॅली मार्गावर चोख पोलिस बंदोबस्त तैनात
लोणावळा शहरातील खंडाळा, गवळीवाडा, तुंगार्ली येथील चौकात संपूर्ण रॅलीवर फुलांची उधळण करून फटाके फोडून रॅलीचे स्वागत करण्यात आले. लोणावळा शहर पोलिसचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत जाधव व ग्रामीणचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप येडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण रॅली मार्गावर चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.