जळगाव : हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू असल्याने धरणात पाण्याची आवक वाढत असून सध्या हतनूर धरणाचे 41 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले आहेत. धरणातून तापी नदीपात्रात सद्यपरीस्थितीत 89 हजार 488 क्युसेक विसर्ग सुरू आहे. लवकरच एक लाखांपेक्षा अधिक क्युसेक्स विसर्ग सुरु होणार असल्याने नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
तापी काठावर सतर्कतेचा इशारा
धरणाची पाणी पातळी नियंत्रीत करण्यासाठी आज सायंकाळनंतर प्रकल्पाचे सर्व दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडून 1 लाखापेक्षा अधिक क्युसेक्स पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे तापी काठावरच्या गावातील नागरिकांनी तापी नदीपात्रामध्ये जाऊ नये. तसेच आपली गुरेढोरे जाऊ देवू नये. नदीमधील पाण्याचे पंप सुरक्षित स्थळी हलवावे, पुलावरुन पाणी वाहत असतांना पुल ओलांडू नये, धोकादायक पुलावरुन प्रवास करताना काळजी घ्यावी. कोणतीही आपतकालीन परिस्थिती उद्वभल्यास तातडीने प्रशासनाशी संपर्क साधवा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.