पाणीचोरी थांबविण्यासाठी नीरा डावा कालव्यावर भरारी पथकाची गस्त

0

वालचंदनगर : नीरा डाव्या कालव्याच्या पाण्याचा हेडचा वेग 650 क्युसेक व टेलचा वेग 161 क्युसेक आहे. कालव्यातून दररोज सुमारे 489 क्युसेक पाण्याची गळती होते. त्यात पाणीचोरी रोखण्यासाठी पाटबंधारे विभागाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. पाणीचोरी रोखण्यासाठी पाटबंधारे विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी लक्ष केंद्रित केले आहे. रब्बीच्या दुसर्‍या हंगामातील पिकांसाठी नीरा डाव्या कालव्यामध्ये पाणी सोडले आहे. वीर धरणापासून इंदापूर तालुक्यापर्यंत कालव्याची लांबी सुमारे 153 किलोमीटर आहे.

पुणे, बारामती कार्यालयातील कर्मचारी तैनात…

इंग्रजांच्या काळातील कालवा असल्यामुळे पाणी गळतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. तसेच, याचा गैरफायदा ही अनेक शेतकरी घेत असून, पाणीचोरीचा सपाटा लावतात. सध्या कालव्याच्या हेडमधून 650 क्युसेक वेगाने पाणी वाहत आहे; तर हेडमधून सोडलेले पाणी टेलच्या 59 क्रमांकाच्या वितरिकेतून 161 क्युसेक वेगाने वाहते. सुमारे 489 क्युसेक पाण्याची गळती व चोरी होत आहे. कालव्यालगतची विद्युत रोहित्र बंद केली आहेत. तसेच पाणीचोरीवर कारवाई करण्यासाठी भरारी पथक तयार करण्यात आले आहे. यामध्ये पाटबंधारे विभागातील पुणे, बारामती कार्यालयातील कर्मचार्‍यांचा सहभाग आहे.

रब्बीच्या आवर्तनास सुरुवात…

बारामती व इंदापूर तालुक्यामध्ये गस्त सुरू आहे. सध्या शेटफळ तलावामध्ये पाणी सोडण्याचे काम सुरू असून, 200 दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाल्यानंतर रब्बीच्या हंगामातील पिकांना पाणी दिले जाणार आहे. तीन टीएमसी पाण्यामध्ये रब्बीचे आवर्तन पूर्ण करायचे आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये रब्बीच्या आवर्तनास सुरवात होणार असल्याचे पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.