पुणे । पुणे आणि परिसरात उन्हाची तीव्रता मोठ्याप्रमाणात वाढली आहे. तापमानाचा पारा 40 अंशावर पोहोचला असून प्रखर उन्हामुळे बाष्पीभवन प्रक्रिया वेगाने होऊन पाणीसाठे वेगाने कमी होत आहेत. एप्रिल महिन्यातच उन्हाचा कडाका वाढल्याने जूनच्या पाहिल्या आठवड्यापर्यंत पाण्याची टंचाई उद्भवू शकते, अशी शक्यता वर्तविली जात आहे. तर दुसरीकडे पुणेकरांकडून पाणी वापर कमी होणे अपेक्षित असताना तो वाढलेलाच दिसून येत आहे. माणसी दररोज 150 लिटर पाणी वापर आवश्यक असताना सध्या हा वापर 300 लिटर प्रतिदिन प्रति माणसी एवढा आहे. त्यामुळे पाण्याच्या काटकसरीची गरज असल्याचे संबंधित विभागाकडून सांगण्यात येत आहे. अन्यथा यावर्षी पाणीसाठा चांगला असला तरी पाऊस लांबला तर अडचण निर्माण होऊ शकते.
पुणेकरांनी येत्या काही दिवसात प्रमाणापेक्षा जास्त वापर केला तर मात्र पुणेकरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. पुणे शहरात पाणीपुरवठा करणार्या चार धरणांपैकी टेमघर हे धरण दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे केवळ तीन धरणांमधून पुणे शहराला पाणी पुरवठा सध्या होत आहे. या तीन धरणांचा मिळून पाणीसाठा हा 10.09 टीएमसी इतका आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणार्या चार धरणांपैकी खडकवासला मध्ये 01.56टीएमसी, पानशेतमध्ये 06.46 टीएमसी, वरसगावमध्ये 02.07 टीएमसी तर टेमघर धरण दुरुस्तीसाठी बंद आहे. तीनही धरणातील मिळून पाणीसाठा 10.09 टीएमसी इतका आहे. जो मागील वर्षी तिन्ही धरणांमधील पाणीसाठा 09.13 टीएमसी एवढा होता. मात्र शहराच्या पाणीपुरवठा बरोबरच ग्रामीण भागातील शेतीलादेखील पाणी देणे गरजेचे आहे. त्यात तापमानात वाढ झाल्याने मोठ्या प्रमाणात होणारे बाष्पीभवन यामुळे पाणीसाठ्यात कमी होऊ शकते. म्हणून पुणेकरांनी देखील पाण्याचा वापर कमी प्रमाणात केल्यास भविष्यात पाणी टंचाईचे संकट टळू शकते.
पाणी काटकसरीने वापरणे गरजेचे
उन्हाचा तडाखा वाढल्याने राज्यातील अनेक पाणीसाठे आटू लागले आहेत. पुणे शहराला पाणीपुरवठा करणार्या धरणांची परिस्थिती पाहता पुणेकरांची तहान भागणार आहे. सध्या पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्या खडकवासला, वरसगाव, पानशेत या धरणामध्ये पावसाळ्यापर्यंत मुबलक पाणीसाठा आहे. तो गतवर्षीपेक्षा एक टीएमसी जादा आहे. पावसाळ्याला अजून एक महिन्यापेक्षा ज्यास्त कालावधी बाकी आहे. सध्या 10.09 टीएमसी पाणीसाठा आहे. मात्र पुणेकरांच्या पाणी वापरामध्ये काटेकोरपणा नसल्याने भविष्यात पाऊस लांबला तर मात्र पंचाईत होऊ शकते. धरणात पाणीसाठा जादा असला तरीदेखील उन्हाचा ताप मात्र मागील अनेक दिवसांपासून अधिक आहे. त्यामुळे धरणातील पाण्याचा बाष्पीभवन होण्याचा वेगदेखील मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे पाणी मुबलक प्रमाणात असले तरी पुणेकरांनीदेखील पाणी काटकसरीने वापरणे गरजेचे आहे. पुण्याच्या पाणी पुरवठ्यावर अद्याप परिणाम झालेला नाही. मात्र पुणेकरांकडून होणार्या पाण्याचा वापर हा ठरवून दिलेल्या पाण्यापेक्षा दुपट्टीने जास्त होत आहे.