पिंपरी-चिंचवड : महापालिकेतर्फे पाणीपट्टीची वसुली मोहीम चालू आहे. त्याअंतर्गत 31 मार्चपर्यंत जे थकबाकीदार थकबाकीची रक्कम भरणार नाहीत; त्यांच्या थकबाकीवर 10 टक्के दंड लावण्यात येणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागप्रमुख रवींद्र दुधेकर यांनी दिली. महापालिकेतर्फे पाणीपट्टी वसुली मोहिमेत थकबाकीदारांचे नळजोड तोडण्याची कारवाई चालू असून, त्यानुसार आजअखेर 250 नळजोड पाणीपुरवठा विभागातर्फे तोडण्यात आले आहेत, असेही दुधेकर यांनी सांगितले.
30 कोटी रुपयांची वसुली
30 हजार रुपयांच्या पुढे थकबाकी असणार्या सुमारे साडेतीन हजार थकबाकीदारांना नोटीसही बजावण्यात आली आहे. तसेच वसुलीमध्ये चालू आर्थिक वर्षातील 28 कोटी रुपयांच्या वसुलीपैकी 23 कोटींची वसुली झाली आहे. तर थकबाकीमध्ये 35 कोटी रुपयांच्या थकबाकीपैकी 7 कोटींची वसुली झाली आहे, अशी एकूण 30 कोटी रुपयांची पाणीपट्टी वसुली झालेली आहे.
थकबाकी टाळण्यासाठी उपाययोजना
या थकबाकीला योग्य ते नियोजन देण्यासाठी पुढील आर्थिक वर्षात दर महिन्याला वसुलीचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानुसार वसुली व पाणीपट्टीचा भरणा यांचे 12 महिने कामकाज चालू राहील, शिवाय थकबाकीही कमी होतील, असेही दुधेकर यांनी सांगितले. नागरिकांनी लवकरात लवकर कर भरणा करून दंड तसेच नळजोड तोडण्याची कारवाई टाळावी. नागरिकांच्या सोयीसाठी सुट्टीच्या दिवशीही करसंकलन कार्यालये खुली राहणार आहेत. तसेच ऑनलाइनही कर भरता येणार आहे. त्यामुळे या सुविधांचा जास्तीत-जास्त लाभ घेत पाणीपट्टी भरावी, असे आवाहन पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.