ठाणे । शहरातील पाणीपट्टीची वसुली नोव्हेंबर अखेरपर्यंत न झाल्यास डिसेंबर महिन्यापासून मोठ्या प्रमाणावर व्यापक नळ संयोजने खंडीत करण्याची मोहिम हाती घेण्याचे आदेश ठाणे महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत. ठाणे महापालिका आयुक्तांनी आढावा बैठकीत हे आदेश दिले आहेत. पाणीपट्टी वसुली योग्य तर्हेने झाली नसल्याची गंभीर दखल पालिका आयुक्तांनी घेतली आहे. सर्व प्रभाग स्तरावरील अधिकार्यांनी नोव्हेंबर अखेर वसुलीसाठी कठोर प्रयत्न करावे असे पालिका आयुक्तांनी अधिकार्यांना खडसावले. पाणीपट्टीबाबत काही वाद असल्यास आधी पाणीपट्टी वसूल करून घ्यावी आणि नंतर जास्त रक्कम घेतली गेली असल्यास ती रक्कम पुढील सत्रातील देयकामध्ये समायोजित करण्याच्या सूचनाही पालिका आयुक्तांनी अधिकार्यांना दिल्या आहेत.
ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व सार्वजनिक आणि सामुदायिक शौचालयांना नोव्हेंबरअखेर पाणी, मलनिस्सारण आणि वीज जोडणी देण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे शौचालयाच्या साफसफाईची कामे स्थानिक महिला गटांना देण्याबरोबरच या शौचालयांची नियमित तपासणी करण्यासाठी एक अधिकारीही नेमला जाणार आहे. शहरातील सर्व सार्वजनिक आणि सामुदायिक शौचालयांची पाहणी करून ज्याठिकाणी पाणी नसेल अशा ठिकाणी नळजोडणी देण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले. दरम्यान, पाणीपट्टीबाबत ठाणे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पाणीपुरवठा अधिकार्यांना चांगलेच धारेवर धरले. काही वाद असल्यास आधी पाणीपट्टी वसूल करून घ्यावी आणि नंतर जास्त रक्कम घेतली गेली असल्यास ती रक्कम पुढील सत्रातील देयकामध्ये समायोजित करण्याच्या सूचनाही पालिका आयुक्तांनी अधिकार्यांना दिल्या आहेत.
कार्यवाही करण्याचे आदेश
ठाणे शहरातील सार्वजनिक शौचालयांची अवस्था फारच बिकट आहे. तसेच झोपडपट्टीत परिसरात शौचालयांची दुरवस्था लक्षात घेता प्रत्येक सामुदायिक आणि सार्वजनिक शौचालयाला वीज जोडणी द्यावी तसेच मलनिस्सारण विभागाने शहरातील सर्व शौचालये मलनिस्सारण वाहिन्यांशी जोडण्याची कार्यवाही करावी असे आदेशही ठाणे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी यावेळी दिले. सध्या सार्वजनिक शौचालयांची साफसफाई ज्या संस्थेद्वारे केली जाते. त्या संस्थेची कामे बंद करून ही कामे स्थानिक महिला गटांतर्फे करावीत, असे आदेशही पालिका आयुक्तांनी दिले आहेत.