पाणीपट्टी दरवाढीवरून भाजप नगरसेवकांचा ‘घरचा आहेर’

0

प्रशासन नियम धाब्यावर बसवत असल्याचा आरोप; दरवाढीवरुन सत्ताधार्‍यांमध्ये मतभेद

पिंपरी-चिंचवड : शहरात अनियमित व अपुर्‍या दाबाने पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. त्यातच महापालिकेने पाच टक्के पाणीपट्टी दरवाढ प्रस्तावित केल्याने रोषात भर पडत आहे. त्यामुळे दरवाढ रद्द करावी, अशी मागणी भाजपच्या नगरसेवकांनी केली आहे. तसेच प्रशासन नियम धाब्यावर बसवत असल्याचा आरोप देखील केला आहे. दरवाढीवरुन सत्ताधार्‍यांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत.

नागरिकांत प्रचंड रोष
शहराच्या विविध भागात कमी दाबाने व अनियमित पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. त्यातच प्रशासन दरवाढ करुन या असंतोषात आणखी भर घालत आहे. महापालिकेच्या अधिनियम कलम 129 (1) (अ) मध्ये पालिका वाजवी वाटेल अशा कर योग्य मूल्याच्या टक्केवारीने पाणीपट्टी आकारण्याची तरतूद आहे. परंतु, प्रशासन या अधिनियमाची पायमल्ली करुन सर्व नियम धाब्यावर बसवित असल्याचा आरोप भाजपच्या नगरसेवकांनी केला आहे.

नगरसेवकांचे निवेदन
प्रस्तावित पाणीपट्टी दरवाढ अन्यायकारक असून या दरवाढीस आमचा तीव्र विरोध आहे. या विरोधाची गांभीर्याने दखल घ्यावी. संपूर्ण शहरात मुबलक प्रमाणात समान पाणीपुरवठा करावा. प्रस्तावित पाणीपट्टी दरवाढ करावी, अशी मागणी शहर सुधारणा समितीचे सभापती सागर गवळी, ’ग’ प्रभागाचे अध्यक्ष अभिषेक बारणे, नगरसेवक मोरेश्‍वर शेडगे, संदीप कस्पटे, हर्षल ढोरे, तुषार कामठे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.