धुळे : महापालिकेच्या कर विभागात तसेच पाणीपट्टी विभागात नागरिकांकडून जमा करण्यात आलेला कर हा शासनाच्या तिजोरीत जशाचा तसा न भरता नागरिकांनी भरलेल्या करापेक्षा कमी रक्कमेची पावती त्यांना देण्यात येते आणि आकडेमोड करून आलेल्या कररूपी रक्कमेत भ्रष्टाचार केला जातो. असा पुराव्यासह गंभीर आरोप राष्ट्रवादी काँगे्रस पक्ष प्रभाग 16 च्या नगरसेविका कशीश गुलशन उदासी यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे केला आहे.आयुक्तांना दिलेल्या निवेदनात उदासी यांनी म्हटले आहे की, महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाकडील देयके जमा करण्यासाठी एचडीएफसी बँकेचे स्वतंत्र काऊंटर सुरु केलेले आहे.
2 हजारांनी कमी पावती
काऊंटरवरील बँकेचे कर्मचारी हे नागरिकांकडुन कराची संपुर्ण रक्कम घेवुन त्यांना कमी रक्कमेच्या पावत्या देत असल्याचे निदर्शनास आले आहे. दि.28 मार्च रोजी रमेश केशवदास चंदनानी हे वसुली विभागातून 4529 रूपयांची स्लिप घेवुन एचडीएफसी बँकेच्या काऊंटरवर गेले असता त्यांनी संपुर्ण रक्कम भरल्यांवरही केवळ 2529 रूपयांची पावती देण्यात आली.
सदस्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष
त्याचप्रमाणे पाणीपट्टी विभागातही कर्मचार्यांची मनमानी सुरु असून मागील वर्षाची पाणीपट्टी पावती दाखवली नाही तर गेल्या तीन वर्षांची पाणीपट्टी आपणास भरावी लागेल असे उत्तर दिले जाते. त्यामुळे नागरिकांना प्रचंड आर्थिक व मानसिक त्रासातून जावे लागत आहे. ही बाब अतिशय गंभीर असून यासंदर्भात मनपा सदस्यांनी देखील तक्रार केल्या आहेत. यासर्व प्रकारात आपण स्वतः लक्ष देण्याची गरज असून अशा बेजबाबदार कर्मचार्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, असेही कशीश उदासी यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.