पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पाणीपट्टी वाढवण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावाला पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेने विरोध दर्शवला असून, तीन तास पाणीपुरवठा करण्याची तसेच पाणी दरात कपात करण्याची मागणी केली आहे. पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातील सेक्टर नंबर 7, 10, कुदळवाडी, तळवडे, शांतीनगर या परिसरात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून 30 रुपये प्रतिहजार दराने उद्योगांना पाणीपुरवठा केला जातो. परंतु, हा पाणीपुरवठा फक्त एक वेळ आणि तोदेखील अत्यंत कमी दाबाने व कमी वेळ केला जातो. त्यामुळे बर्याच वेळा उद्योजकाना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते, असे संघटनेचे म्हणणे आहे.
लघु उद्योजक अडचणीत
पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातील कामगारांना पिण्यासाठी व इतर कामासाठी महापालिका प्रशासनाकडून पाणीपुरवठा केला जातो. या पाण्याचा कोणताही व्यावसायिक वापर उद्योजकांकडून केला जात नाही. तरीही पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून व्यावसायिक दराने पाणीपट्टी आकारली जाते, असे संघटनेचे म्हणणे आहे. प्रस्तावित पाणीपट्टीवाढ रद्द करून सध्या आकारला जाणारा दरसुद्धा कमी करावा व उद्योगांना दिवसातून किमान दोन वेळा पूर्ण दाबाने तीन तास तरी पाणी पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे. लघुउद्योजक मंदीमुळे अडचणीत आहेत. त्यातच महापालिकेने पाणीपट्टीत वाढ केल्यास लघुउद्योजकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
पाणीपट्टीवाढ अन्यायकारक
या विषयासंदर्भात बोलताना पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे म्हणाले की, महापालिकेच्या प्रस्तावित पाणीपट्टीवाढीचा निर्णय हा उद्योजकांवर अन्यायकारक आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा करणार्या जलवाहिन्या जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी गळती होऊन पाणी वाया जाते. पाणी मीटर सदोष असल्यामुळे उद्योजकांना चुकीचे बिल दिले जाते. उद्योगांना दिवसातून किमान 2 वेळा पूर्ण दाबाने तीन तास तरी पाणीपुरवठा करावा, यासाठी पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटना गेली 7 ते 8 वर्षांपासून महापालिकेकडे पाठपुरवा करत असताना महापालिकेकडून फक्त आश्वासन दिले जाते, असे त्यांनी सांगितले.