जलसंपदा विभागाचा पालिकेला झटका; पालकमंत्री बापट यांच्या घोषणा हवेतच
पुणे : पुणेकरांच्या पाण्यात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. पुणेकरांना दोन वेळा पाणीपुरवठा केला जाईल, ही पालकमंत्री गिरीश बापट यांनी केलेली घोषणा हवेत विरली आहे. महापालिकेला 1150 एमएलडी पाणी मंजूर झाले आहे. असे असतानाही पालिका खडकवासला धरणातून जादा पाणी घेत असल्याचे निदर्शनास आल्याने जलसंपदा विभागाने पाणी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गुरुवारी सकाळपासून शहरातील विविध भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला.
जादा पाणी घेत असल्याचे सांगत; पाटबंधारे विभागाकडून पाणी बंद
कालवा समितीच्या बैठकीत पालिकेस 1150 एमएलडी पाणी मंजूर झाले आहे. असे असतानाही महापालिका खडकवासला धरणातून जादा पाणी घेत असल्याचे निदर्शनास येताच पाटबंधारे विभागाकडून बुधवारी दुपारी 4 वाजता पालिकेस दिले जाणारे पाणी बंद करण्यात आले. अचानक बंद झालेल्या या पाणीपुरवठ्यामुळे पालिकेला केवळ पर्वती जलकेंद्रांतूनच पाणीपुरवठा करता आला. तर लष्कर जलकेंद्राला पाणीच देता आले नाही. पूर्व भागातील खराडी, वडगावशेरी, चंदननगर, हडपसरच्या काही भागाचा पाणीपुरवठा यामुळे विस्कळीत झाला आहे. पालिकेच्या अधिकार्यांनी जलसंपदा विभागाशी चर्चा सुरू असल्याचे सांगितले.
जलसंपदा विभागाची मनमानी
जलसंपदा खात्याची मुजोरी सुरूच आहे. पालिका अधिक पाणी घेत असल्याचे स्पष्टीकरण देत यापूर्वी देखील जलसंपदा विभागातील अधिकार्यांनी पालिकेला वेठीस धरले होते. काही महिन्यांपूर्वी पालिकेच्या पर्वती जलशुद्धीकरण केंद्रात जाऊन खात्याच्या अधिकार्यांनी पाणीपुरवठा बंद केला होता. यामुळे पुढील तीन ते चार दिवस शहरातील नागरिकांना पाण्याचा त्रास सहन करावा लागला होता. त्यानंतर पालिकेने थकीत बिल न दिल्याचे कारण पुढे करत पुणेकरांचा पाणीपुरवठा खंडित केला होता. जलसंपदा खात्यातील अधिकार्यांच्या मनमानी कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र पालिकेत, राज्यात सत्ताधारी असलेले भाजपचे कारभारी त्यांना प्रत्येकवेळी पाठीशी घालत असल्याने त्यांची मुजोरी वाढतच असल्याची चर्चा सुरू आहे