पाणीपुरवठा योजनेची भारनियमनाच्या कचाट्यातून झाली सुटका

0

फैजपूर। लोहारा पिकअपवर नुकतेच स्वतंत्र एक्स्प्रेस फीडर कार्यान्वित झाले. यामुळे फैजपूर शहरासाठी असलेल्या पाणीपुरवठा योजनेची भारनियमनाच्या कचाट्यातून सुटका होत सुरळीत पुरवठा करणे शक्य होईल. मध्यंतरी रखडलेल्या एक्स्प्रेस फीडरच्या कामाला चालना मिळावी, यासाठी सातत्याने या परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत असलेली मागणी लक्षात घेता प्रशासनाला जागे केले होते. फैजपूर शहरासाठी गारबर्डी (ता.रावेर) धरणाच्या लोहारा उपसा सिंचनवरुन पाणी पुरवले जाते. यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत स्वतंत्र योजना कार्यान्वित आहे.

पालिका प्रशासनाने केले सातत्याने प्रयत्न
दरम्यान, लोहारा येथील तलावात मुबलक पाणी असले तरी येथे होणार्‍या 11 तासांच्या भारनियमनांमुळे फैजपुरात ठरलेल्या वेळापत्रकानुसार पाणी पोहोचवणे जिकिरीचे ठरते. याच कारणामुळे मध्यंतरी शहरात पाणी टंचाई निर्माण झाली होती. या अडचणी सोडवण्यासाठी पालिकेने सातत्याने प्रयत्न केले. परिणामी जिल्हा नियोजन समितीने लोहारा पिकअपवर स्वतंत्र एक्स्प्रेस फीडरला मान्यता दिली होती.

24 तास विज पुरवठा मिळणार
27 लाख रुपये खर्चाच्या या कामातून 11 केव्ही क्षमतेचे एक्स्प्रेस फीडर उभे राहिले. दोन महिन्यापूर्वी हे काम पूर्णत्वास आले. दरम्यान, या फीडरला रावेर तालुक्यातील गौरखेड़ा सबस्टेशनवरून विज जोडणी करण्यात आली आहे. परिणामी लोहारा पिकअपवर यापूर्वी होणार्‍या 11 तासांच्या भारनियमनातून सुटका झाली आहे. शिवाय तांत्रिक अडचणींचा अपवाद वगळता एक्स्प्रेस फीडरमुळे लोहारा पिकअपवर 24 तास विज उपलब्ध असेल.

विजेचा प्रश्‍न निकाली
लोहारा पिकअपवर नुकतेच स्वतंत्र एक्स्प्रेस फीडर कार्यान्वित झाल्यामुळे या परिसरातील भारनियमन बंद झाले आहे. त्यामुळे आता भविष्यातही फैजपूर शहरासाठी लोहारा पिकअपवरून हवे तेवढे पाणी उचलता येईल, अशी स्थिती आहे. फैजपूर शहरात लोहारा पिकअपवरून पाणी आणले गेले. मात्र, यापूर्वी शहरात होणार्‍या भारनियमनामुळे योजनेवरून पाणीपुरवठा करणे अडचणीचे ठरत होते. सावदा-फैजपूर औद्योगिक वसाहतीच्या स्वतंत्र एक्स्प्रेस फीडरवरून वीज आणून हा प्रश्न निकाली निघाला. यामुळे रहिवाशांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.