पाणीपुरवठा योजनेच्या दोन निविदांना स्थायीची मंजुरी

0

पिंपरी-चिंचवड : केंद्र सरकारच्या अमृत अभियानांतर्गत पिंपरी-चिंचवड शहरासाठी दोन टप्प्यात चोवीस तास पाणीपुरवठा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. एकूण 217 कोटी खर्चाच्या या कामासाठी यापूर्वी एकच निविदा काढण्यात आली होती. त्यावेळी ठेकेदारांनी निविदा रक्कमेपेक्षा 17 टक्के जादा दर सादर केले होते. त्यानुसार ठेकेदारांना 37 कोटी रुपये जादा मोजावे लागले असते. मात्र आयुक्तांनी या कामाच्या चार वेगवेगळ्या निविदा प्रसिद्ध केल्या. त्यानंतर ठेकेदारांनी 2.7 ते 4.4 टक्के जादा दर सादर केले आहेत. त्यामुळे या कामासाठी 37 कोटी ऐवजी केवळ सहा कोटी रुपये जादा द्यावे लागणार आहेत. या प्रकल्पाच्या 100 कोटींच्या दोन निविदांना स्थायी समितीने मंजुरी दिली. अध्यक्षस्थानी सभापती सीमा सावळे होत्या. विषय पत्रिकेवर 87 विषय होते. 81 विषय मंजूर करण्यात आले.

महापालिकेतर्फे 50 टक्के निधी
अमृत अभियानांतर्गत संपूर्ण शहराला चोवीस तास पाणीपुरवठा करण्याचा प्रकल्प राबविला जाणार आहे. अमृत अभियानाच्या पहिल्या टप्प्यात पिंपरी-चिंचवड शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पास मान्यता देण्यात आली. प्रकल्पासाठी केंद्र सरकारतर्फे प्रकल्प किमतीच्या 33.33 टक्के, राज्य सरकारतर्फे 16.67 टक्के आणि पिंपरी महापालिकेतर्फे 50 टक्के निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. पहिल्या टप्यात शहराच्या 60 टक्के भागात ही योजना राबविण्यात येणार आहे.

दोन वर्षांनंतर चांगले परिणाम
शहरात सध्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे या प्रकल्पाची अत्यंत आवश्यकता आहे. हा प्रकल्प मोठा असून त्याच्या कामाला थोडासा विलंब होणार आहे. मात्र, दोन वर्षानंतर याचे परिणाम दिसतील असे सांगत स्थायीच्या अध्यक्षा सीमा सावळे म्हणाल्या, पाणी गळती मोठ्या प्रमाणात होत आहे. पाणी गळती रोखण्याच्या सूचना पाणीपुरवठा विभागाला केल्या आहेत. पाणी गळती रोखल्यास पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. व्यावसायिक, हॉटेल, शाळांचे अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्याचे काम हाती घेतले आहे. पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईन जुन्या झाल्या आहेत. या कामाअतंर्गत पाण्याचे पाईप बदलण्यात येतील. पालिकेने काम करताना स्थानिक नगरसेवकांना नकाशे द्यावेत. तसेच पालिकेच्या संकेतस्थळावर देखील अपलोड करावा. स्थापत्य विभागाशी समन्वय ठेवावा. पुढील दोन वर्षात शहरातील पाणीपुरवठ्यात सुसूत्रता येईल, असा विश्‍वास सावळे यांनी व्यक्त केला.

काम अडविल्यास गुन्हा दाखल
चोवीस तास पाणीपुरवठा प्रकल्पाचे काम वेगात करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे काम कोणी अडविल्यास संबंधित व्यक्तीचे एकदा, दोनदा मत जाणून घेण्यात येईल. तरीही, काम अडविल्यास संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा, अशा सूचना स्थायी समितीने पाणीपुरवठा विभागाच्या अधिका-यांना दिल्या आहेत.