अमळनेर : तालुक्यातील कळमसरे व 26 गावे तसेच नगाव व 12 गावे या प्रादेशिक पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यासंदर्भात हालचाली गतिमान झाल्या असून या संदर्भात पुढील कार्यवाहीसाठी आ स्मिता वाघ यांच्या मागणी नुसार कृषी, पणन व ग्रामिण पाणी पुरवठा राज्य मंत्री ना सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन बुधवार 20 रोजी नागपूर येथे करण्यात आले आहे.
या संदर्भात आमदार स्मिता वाघ यांनी शासनदरबारी वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतर 13 डिसेंबर रोजी त्यांनी ना सदाभाऊ खोत यांना पत्र दिले होते. यात त्यांनी अमळनेर तालुक्यातील कळमसरे व 26 गावे तसेच नगाव व 12 गावे या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेस सन राष्ट्रीय पेयजल योजना 2016।17 अंतर्गत मंजुरी मिळण्याबाबत विनंती करण्यात आली होती. परंतु या योजनेस मंजुरी न मिळाल्याने सद्यस्थितीत या योजनेवर अवलंबून गावात तीव्र पाणीटंचाई असून टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे अशी खंत व्यक्त करून या पाणीपूरवठा योजनेस तात्काळ मंजुरी देऊन निधी उपलब्ध करण्याची मागणी केली होती. या मागणीची तात्काळ दखल मंत्र्यांनी घेऊन ही योजना कार्यान्वित करण्यासाठी सुचना दिल्या आहेत.