जळगाव : महानगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील मेंटेनन्स विभागात गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. यानुसार गैरव्यवहाराची त्रिसदस्यीय समितीचे चौकशी केली होती. चौकशी अहवालात पाणीपुरवठा मेन्टनन्स विभागात हातपंप व मोटारपंप खरेदी व दुरुस्तीमध्ये सुमारे 3 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यावरुन आयुक्तांच्या आदेशाने संबधित 5 जणांची विभागीय चौकशी देखील अंतिम टप्प्यात आहे. पाणीपुरवठा विभागातील गैरव्यवहाराच्या संशयावरुन तत्कालीन आयुक्त संजय कापडणीस यांनी चौकशीचे आदेश दिले होते. पाणीपुरवठा विभागात 2001 पासून कामांची चौकशी त्रिसदस्यीय समितीकडून करण्यात येत आहे. पुरवठा विभाग, जलशुध्दीकरण प्रकल्प, 22 युनिट कार्यालये, हातपंप, मोटारपंप मेंटनन्स अशा कार्यालयातील मोजमापे, कामे, वस्तुंचा खरेदी खर्च, दुरुस्तीचा खर्च या सर्वांचा लेखाजोगा असलेली सर्व मेजरमेंट बुक सील करण्यात आले होते. यानंतर चौकशी समितीने शहरात महापालिकेने बसविलेल्या मोटारपंप व हातपंपाची स्पॉट तपासणी देखील करण्यात आली होती. तत्कालीन लेखापरिक्षक सुभाष भोर, केमिस्ट विजय यादव व अभियंता योगेश बोरोले यांच्या समितीने केलेल्या चौकशीचा अहवाल आयुक्तांना सादर केला होता.
हातपंप देखभालीत करण्यात आली अनियमितता
महापालिकेने शहरात विविध ठिकाणी बसविलेल्या हातपंपाची स्वतंत्र विभाग असून देखभाल न ठेवल्याने एकूण 558 हातपंपापैकी सुमारे 350 हातपंप तुटलेले तर काहींचे साहीत्य देखील चोरीस गेलेले आढळून आले आहे. त्यामुळे देखभालीत अनियमितता व निष्काळजीपणा झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. समितीला महापालिकेचे 257 मोटारपंप असल्याचा अहावाल अधिकार्यांनी दिला आहे. मात्र एमबीनुसार सुमारे 405 मोटारपंप खरेदी करण्यात आल्याची नोंद आहे. अहावालनुसार 257 पैकी देखील सुमारे 100 मोटारपंप गायब असल्याचे स्पॉट तपासणीमध्ये निष्पन्न झाल्याचे समजते. त्यामुळे या सर्व प्रकरात सुमारे 3 कोटी रुपयाच्या गैरव्यवहाराचा ठपका ठेवण्यात आला आहे. या अहावालावरुन आयुक्त जीवन सोनवणे यांनी निवृत्त पाणीपुरवठा अभियंता यांच्यासह 5 जणांची विभागीय चौकशी सुरु केली आहे. चौकशी अधिकारी ज.रे. बंकापुरे यांच्यासमोर ही चौकशी सुरु असून त्याचे काम देखील अंतिम टप्प्यात आले आहे.