नगरसेवक प्रा. उत्तम केंदळे व कमल घोलप यांची मागणी
पिंपरी-चिंचवड : शहरासह परिसरात यंदा जोरदार पाऊस पडूनसुद्धा योग्य नियोजन व पाणीपुरवठा विभागाच्या निष्क्रीय कारभारामुळे नागरिकांना भर पावसाळ्यातच पाणीटंचाई भासत आहे. निगडी प्रभागात तर वारंवार पाणीटंचाईची समस्या नागरिकांना भेडसावत आहे. निगडीतील पाणी समस्येबाबत सातत्याने तक्रारी होत असल्याने स्थानिक नगरसेवक प्रा. उत्तम केंदळे व कमल घोलप यांनी पाणीपुरवठा विभागाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या विषयासंदर्भात केंदळे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेतली. निगडीतील पाणीपुरवठा सुरळीत करावा, पाणीपुरवठा विभागातील निष्क्रीय अधिकारी व कर्मचार्यांवर कारवाई करावी, अशी मागणीदेखील त्यांनी केली. या मागणीचे निवेदन आयुक्तांना देण्यात आले आहे.
नगरसेवकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष
निगडी प्रभागात पाण्याचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना यापूर्वीही नगरसेवक प्रा. उत्तम केंदळे व कमल घोलप यांनी पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचार्यांना केल्या होत्या. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे नगरसेवक केंदळे व घोलप यांनी आक्रमक भूमिका घेत याप्रश्नी आयुक्तांची तातडीने भेट घेतली. पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी हे नगरसेवकांच्या सूचनांना केराची टोपली दाखवतात. सर्वसामान्य नागरिकांना पाणीपुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे, अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली.
अधिकार्यांच्या भूमिकेविषयी संशय
निगडी प्रभागातील यमुनानगर, सेक्टर 22, निगडी गावठाण, साईनाथनगर डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत व अण्णा भाऊ साठेनगर या परिसरात पाण्याच्या असंख्य तक्रारी आहेत. पाण्याची अनिश्चित वेळ, कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, दूषित व गढूळ पाणीपुरवठा, अशा समस्या वारंवार उद्भवत आहेत. नागरिकांचा जीव मेटाकुटीला आला आहे. यमुनानगर भागाची 24 तास पाण्याचा पायलेट प्रोजेक्टसाठी निवड झाली होती. मात्र, आता तर येथील नागरिकांना पाणी मिळत नसल्याने अधिकार्यांविषयी संशय निर्माण होत आहे, असेही प्रा. केंदळे यांनी म्हटले आहे.