पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक करण्याच्या हालचाली सुरू

0

अधिकृत घोषणा येत्या आठवड्यात; दिवसाआड पाणी मिळण्याची शक्यता

पुणे : खडकवासला धरणातून होणारा दैनंदिन पाणीपुरवठा 1150 ‘एमएलडी’पर्यंत (दशलक्ष लिटर प्रतिदिन) कमी करण्यात येणार असल्याने नवीन वर्षात पुणेकरांना दिवसाआड पाणी मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. महापालिका प्रशासनाने त्यानुसार वेळापत्रक तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याचबरोबर धरणातील पाणीसाठा मर्यादित असल्याने शेतीसाठीचे एक आवर्तनही रद्द करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याबाबतची अधिकृत घोषणा येत्या आठवड्यात करण्यात येण्याची शक्यता आहे. पुण्याला सध्या 1350 ‘एमएलडी’ पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे दिवसातून एकवेळ पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

पुण्याला पाणीपुरवठा करणार्‍या धरणांमधील साठा कमी होत असल्याने पुणेकरांच्या पाणीवापरावर निर्बंध आणावे लागणार असल्याचा आग्रह जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी महापौर निवासस्थानी झालेल्या बैठकीत धरला. जलसंपदा विभागाकडून पुण्याचा दैनंदिन पाणीपुरवठा 1150 ‘एमएलडी’पर्यंत (दशलक्ष लिटर प्रतिदिन) कमी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. धरणातील पाणीसाठा आणि त्याचे वितरण याची सांगड घालण्यासाठी शहराला 1150 ‘एमएलडीने’च पाणीपुरवठा करावा लागेल, असा दावा जलसंपदा विभागाकडून करण्यात येत आहे.

शेतीसाठीचे आवर्तन रद्द होणार?

शेतीसाठी रब्बीचे दोन, खरिपाचे एक आणि उन्हाळी एक अशी चार आवर्तने नियोजित आहेत. त्यामधील खरीप आणि रब्बीचे एक आवर्तन सोडण्यात आले असून, त्यानुसार सात ते आठ ‘टीएमसी’ पाणी सोडण्यात आले आहेत. पुढील रब्बीचे आवर्तन 15 जानेवारीनंतर नियोजित आहेत. एप्रिल-मे महिन्यांत 40 दिवसांचे उन्हाळी आवर्तन सोडण्यात येणार असून, त्यावेळी साडेतीन ‘टीएमसी’ सोडण्याचे प्रस्तावित आहे. नुकत्याच झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत पुण्याच्या पाणी कपातीबरोबर शेतीच्या पाण्यातही कपात करणार असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. त्यामुळे रब्बीचे सोडण्यात येणारे आवर्तन रद्द करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.