दोंडाईचा : पालिकेच्या निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे पर्यटन व रोहयो मंत्री जयकुमार रावल यांनी दोंडाईचा शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजनेला मंजूरी मिळविली असून त्यात नविन अत्याधुनिक जलशुध्दीकरण केंद्र, शहरातील वितरण व्यवस्था आदी कामांसाठी 20.91 कोटी रूपये मंजूर झाले आहेत, दोंडाईचा शहराच्या पाणीपुरवठा योजनेला दि. 22 रोजी राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानातंर्गत मंजूरी दिली आहे. त्यामुळे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या पाठपुराव्याला अखेर यश लाभले आहे. पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्यामुळे राज्याचे रोहयो व पर्यटन मंत्री जयकुमार रावल, नगराध्यक्षा नयनकुंवरताई रावल यांनी पालिकेच्या आवारात लहान मुलाला पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला.
आनंद केला साजरा
शहराला पाणीपुरवठ्याच्या योजनेसाठी आणि जलशुद्धीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मिळाल्याचे कळताच शिवाजी पुतळयावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यावेळी नगरसेवक विक्रांत रावल, पाणीपुरवठा सभापती रणविरसिंह देशमुख, बांधकाम सभापती संजय मराठे, नरगसेवक निखीलकुमार जाधव, माजी विरोधी पक्षनेता प्रविण महाजन, नगरसेवक सागर मराठे, भरतरी ठाकूर, कृष्णा नगराळे, खलील बागवान, नरेंद्र गिरासे, प्रमोद चौधरी, पंकज चौधरी,राजेश ईशी, यांच्यासह पालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
हायड्रोलिक मॉडेंलिंगच्या आधारे वितरण व्यवस्था
दोंडाईचा शहराला तापी नदीवरून पाणीपुरवठा होत असतो, पंरतू शहराची लोकसंख्या आणि वाढीव भागामुळे पुरेस्या प्रमाणात पाणीपुरवठा करणे पालिकेला शक्य होत नव्हते, शिवाय जुन्या योजनेव्दारे स्वच्छ पाणीपुरवठा देखील होत नसल्यामुळे शहरातील नागरीकांना तीन ते चार दिवसाआड पाणीपुरवठा होत होता, म्हणून मोठया प्रमाणावर ओरड होत असते, पालिकेच्या निवडणुकीत पाणीटंचाईचा मुददा घेवून पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी तत्कालीन सत्ताधारी मंडळींचा समाचार घेत सत्ता दिल्यानंतर तात्काळा जलशुध्दीकरण केंद्रासह पाणीपुरवठा योजना मंजूर करण्याचे आश्वासन दिले होते, त्यानुसार मंत्री रावल शहरासाठी सन 2045 ची लोकसंख्या गृहीत धरून 135 लि. प्रति व्यक्ती प्रती दिवस पाणीपुरवठा गृहीत धरून त्यात 12.5 दश लक्ष लिटर प्रतिदिवस क्षमता असलेले अत्याधुनिक जलशुध्दीकरण केंद्र, याशिवाय संपूर्ण शहरातील जुन्या वाहिनी काढून नविन हायड्रोलिक मॉडेंलिंगच्या आधारे नविन वितरण व्यवस्था प्रस्तावित केल्याने नागरीकांना सर्व ठिकाणी योग्य दाबाने व पुरेस्या प्रमाणात पाणीपुरवठा होण्या मदत होईल.
रावल यांचा पाठपुरावा
या योजनेच्या पूर्ततेसाठी ना. रावल यांचा पाठपुरावा महत्वाचा ठरला. दाऊळ जलशुध्दीकरणावर 2 नविन विदयुत पंप, आदी कामांचा समावेश करण्यात आला. परीपूर्ण प्रस्ताव शासनाकडे सादर झाल्यानंतर दि. 17 जानेवारी 2017 रोजी नगरविकास विभागात नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांच्याकडे बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सविस्तर सादरीकरण करण्यात आले. त्यानुसार मंत्री रावल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून दोडाईचा पालिकेसाठी नविन जलशुध्दीकरण केंद्रासह पाणीपुरवठा योजनेसाठी 20 कोटी 91 लक्ष रूपये मंजूर करण्यात आले आहेत, लवकरच या कामाची निवीदा होवून कामाला प्रत्यक्षात सुरवात होणार आहे.