पाणीप्रश्‍नाला दिले ऐक्याच्या वज्रमुठीने उत्तर -प्रा.पंकज पाटील

0

भुसावळ- जल व्यवस्थापन ही काळाची गरज असून या पावसाळ्यातील पाणी आपण जमिनीत जिरावायला हवे. विपुल प्रमाणात वृक्ष लागवड केल्यास जमिनीतील पाण्याचा साठा टिकून राहू शकतो. अनेक रहिवाश्यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा कार्यान्वित केल्याने पाणी जिरण्यास मदत होईल तसेच परीसरातील पाणी समस्येमुळे भुसावळ स्वयंपूर्ण ग्रामीणची अभूतपूर्व आशी एकी झाली आहे. ती नागरिकांनी टिकवून ठेवणे गरजेचे आहे. पाच हजार रहिवाश्यांच्या वज्र मुठीमुळेच आपली समस्या निवारण झाली असून आत्ता न थांबता आपणच तयार केलेल्या पायवाटेवर आपणच चालत राहिलो तर अनेक समस्या सहज सुटतील. जल बचत व जल संरक्षण ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन प्रा.पंकज पाटील यांनी येथे केले. भुसावळ ग्रामीणमधील पाणीप्रश्‍न सुटल्याने हा प्रश्‍न धसास लावणार्‍या पदाधिकार्‍यांचा सत्कारप्रसंगी ते बोलत होते.

पाणीप्रश्‍न सुटल्याने पदाधिकार्‍यांचा सत्कार
शहरातील विवेकानंद नगर, सदगुरू नगर, गोकुळ नगर, पांडुरंगनाथ नगर, गणपूर्ती नगर, जनकपुरी व सिद्ध हनुमान मंदिर परीसरात गेल्या 15 वर्षांपासून पाणीप्रश्‍न बिकट बनल्याने ज्ञानेश्वर आमले यांच्या नेतृत्वात उपोषण छेडण्यात आले होते. समस्येचे गांभीर्य लक्षात घेता खासदार रक्षा खडसे यांच्या खासदार निधीतून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. यानिमित्त पाणी प्रश्न सोडवण्यासाठी अग्रेसर ज्ञानेश्वर आमले व सहकारी स्वयंपूर्ण भुसावळ ग्रामीण कार्यकारिणी सदस्यांचा सत्कार महाकालेश्वर गणेश मंडळाच्या वतीने करण्यात आला.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
अध्यक्षस्थानी नरवाडे होते. व्यासपीठावर ज्ञानेश्वर आमले, स्वयंपूर्ण ग्रामीणचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, प्रमुख वक्ते जागर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.पंकज पाटील, खडका ग्रामपंचायत सरपंच संजयसिंग पाटील, सदस्य अनिल महाजन, शामासिंग पाटील उपस्थित होते. प्रास्ताविक महाकलेश्वर मंडळाचे अध्यक्ष तुजित चौधरी यांनी केले. परीसरातील नागरिकांनी ज्ञानेश्वर आमले यांचा शाल श्रीफळ व गांधी टोपी देवून गौरव केला. सत्काराला उत्तर देताना ज्ञानेश्वर आमले यांनी सांगितले परीसरातील नागरिकांनी उपोषणाला दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे प्रश्‍न सुटू शकला. प्रसंगी राजेंद्र पाटील, संजयसिग पाटील यांनी विचार मांडले. आशा पाटील यांनी नवीन मतदार नोंदणीचे आवाहन केले. आभार प्रा.प्रशांत बोदवडे यांनी मानले. यशस्वितेसाठी प्रबोध महाले, शैलेश सहानी, जीवन पाटील, नकुल रयापुरे, रितेश चर्‍हाटे व चेतन लढे यांनी परीश्रम घेतले.