पुणे । नियोजित समान पाणीपुरवठा योजनेसाठी खरेदी करण्यात येणारे पाणीमीटर कालबाह्य असल्याचे सांगत, योजनेकरीता अत्याधुनिक मीटर पुरविण्यासाठी अमेरिकेतील कंपनी पुढे आली आहे. विशेष म्हणजे पहिल्या टप्प्यातील खर्च करण्याची तयारीही दाखविली असून, तसे पत्र ‘स्मार्ट सिटी’ कंपनीच्या अधिकार्यांना पाठविले आहे. मात्र, योजनेची अंमलबजावणी महापालिकेच्या स्तरावर होत असल्याने ते पत्र महापौर आणि महापालिका आयुक्तांकडे दिल्याने मीटर खरेदीच्या प्रक्रियेत स्पर्धा होऊन गुणवत्तापूर्ण मीटर मिळण्याची आशा आहे.
पुणेकरांना समान व शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी 2 हजार 325 कोटी रुपयांची योजना राबविण्यात येणार आहे. योजनेच्या सुधारित पूर्वगणकपत्राला मंजुरी मिळाल्यानंतर येत्या जूनपासून योजनेचे काम हाती घेतले जाण्याची शक्यता आहे. त्यात जलवाहिन्या, पाण्याच्या टाक्या, मीटर ही कामे करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत निवासी आणि व्यावसायिक स्वरूपाचे सुमारे सव्वातीन लाख मीटर खरेदी करण्यात येणार असून, त्यासाठी परदेशी कंपन्यांनी तयारी दर्शविली आहे. मीटर पुरविण्याच्या कामासाठी जागतिक पातळीवरील कंपन्यांमध्ये जोरदार स्पर्धा सुरू आहे.
किंमतीची पडताळणी
मीटर पुरविणार्या विविध कंपन्या पुढे आल्या असून, त्यांचे दरपत्रकही महापालिकेला प्राप्त झाले आहे. त्यानुसार मीटरचा दर्जा आणि किंमतीची पडताळणी केली आहे. खरेदी करण्यात येणार्या मीटरचा आकडा कमी होऊन तो पावणेतीन लाख होण्याचा अंदाज आहे. मात्र, मीटर खरेदी टप्प्या-टप्प्याने करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने म्हटले आहे.
काम करणार दर्जेदार
योजनेचे काम वेळेत आणि दर्जा राखून करण्यात येणार आहे. त्यामुळे मीटरसह सर्वच घटक चांगल्या दर्जाचे असतील. ज्या कंपन्या प्रक्रियेत येतील, त्यांच्याकडील मीटरची गुणवत्ता पाहून ते खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. मीटरची गुणवत्ता आणि किंमत हा घटक महत्त्वाचा आहे. ही खरेदी प्रक्रियेनुसार होईल.
– मुरलीधर मोहोळ, अध्यक्ष, स्थायी समिती