पुणे । पुण्यामध्ये पाणी प्रश्न पेटला आहे. शहरात 50 टक्के पाणी कपात करण्याच्या उद्भवलेल्या प्रश्नावरून राजकारण चांगलेच तापले आहे. पाणी कपात हे भाजपचे षडयंत्र असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. तर, पालकमंत्र्यांच्या माध्यमातून जलसंपदा विभागातील अधिकार्यांशी चर्चा करून पाणी कपातीचा प्रश्न सोडविण्याची भूमिका सत्ताधारी भाजपने घेतली आहे.
शहरातील नागरिकांना 24 तास पाणी पुरविण्यासाठी समान पाणी पुरवठा योजना आखण्यात आली. या योजनेसाठी नेमलेल्या सल्लागाराने या कामासाठी सुचविलेल्या निधीवरून सर्वच स्तरांतून टीका झाल्यानंतर जीएमटीचे कारण देऊन ही निवीदा रद्द करण्यात आली. त्यानंतर एस्टीमेट कमिटीने 800 कोटी रुपयांच्या कपातीची निविदा सुचविली. हे प्रकरण गाजत असताना जलसंपदा विभागाने महापालिका प्रशासनास धक्के देण्याचे सत्र सुरू केले.
पाणी कमी पडू देणार नाही
पालकमंत्री गिरीश बापट यांच्याशी चर्चा करुन योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. तर, शहरात कामानिमित्त तसेच शिक्षणानिमित्त दररोज येत असलेल्या लोकसंख्येची माहिती जलसंपदा विभागाने लक्षात घेतलेली नाही. जलसंपदा विभागाने पाणी कमी करण्याचे आदेश दिले असले तरी आम्ही पुणेकरांना पाणी कमी पडू देणार नाही, असे महापैार मुक्ता टिळक यांनी सांगितले.
शहराला 8.19 टीएमसी पाणी देण्याचे आदेश
शहर व परिसरात यंदा मुबलक पाणीसाठा झाला आहे. शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे 100 टक्के भरलेली आहेत. असे असतानाही शहरातील अनेक भागात अपुरा आणि कमी दाबाचा पाणीपुरवठा होतो. पालिकेने ठरवून दिलेल्या कोट्यापेक्षा अधिक पाणी वापरत असल्याचा निष्कर्ष जलसंपदा विभागाने काढला असून पालिकेला दिल्या जाणार्या पाण्यात 15 टीएमसी कपात करून केवळ 8.19 टीएमसी पाणी देण्याचे आदेश काढले. या आदेशाची अंमलबजावणी करायची झाल्यास पुणेकरांना दोन ते तीन दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागणार आहे.
सत्ताधार्यांवर टीकेची झोड
या पार्श्वभूमीवर पालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी राज्य शासनावर आणि पालिकेतील सत्ताधार्यांवर टीकेची झोड उठविली आहे. धरणे पूर्ण भरलेली असतानाही पाणी कमी करण्याचे आदेश जलसंपदा विभाग देत असेल तर हे पालिकेत आणि राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजप सरकारचे अपयश आहे. पुणेकरांचे पाणी कपात करण्याचे भाजपचे षडयंत्र आहे. पुणेकरांनी दाखविलेल्या विश्वासाची परतफेड सत्ताधारी अशा पद्धतीने पाणी कमी करून करत असल्याची टीकाही तुपे यांनी केली आहे.
पाण्याला हात लावू देणार नाही
पालिकेच्या तिजोरीवर डोळा ठेवून सत्तेत आल्यापासून राज्य सरकार निर्णय घेत आहे. यापूर्वी पंधरा वर्षे पालिकेत तसेच राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता होती, मात्र कधीही पुणेकरांचे पाणी कमी करण्याचा निर्णय घेतला नाही. यापुढेही पुण्याच्या पाण्याला हात लावू देणार नाही, असा इशारा काँग्रेसने दिला.