पुणे : गेल्या काही दिवसांपासून भन्नाट पोस्टरबाजी नागरिकांना पाहायला मिळत आहे. ‘कधी शिवडे आय एम सॉरी, तर कधी आपण यांना पाहिलंत का?, ओ नगरसेवक भाऊ, तुम्हाला कुणीही रागावणार नाही, प्लिज, तुम्ही परत या…’ यांसारख्या मजकुरांच्या पोस्टरने परिसर दणाणून सोडला आहे. सध्या शहरात पाणी प्रश्न गंभीर होत चालला आहे. याच पाणी प्रश्नावरून पालकमंत्री गिरीश बापट व महापालिकेतील सत्ताधारी भाजपला गिरीश काय रे.?, दुष्काळ असतानासुद्धा अजितने कधी शहराला पाणी कमी पडू दिले नाही. अशा मजकुराच्या पोस्टरमधून लक्ष्य करण्यात आले आहे.
शहराच्या पाणी वाटपावरून जलसंपदा विभाग आणि महापालिका यांच्यात मागील काही दिवसांपासून निर्माण झालेल्या वादातून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडू लागल्या आहेत. शहरातील विविध भागात हे पोस्टर लावण्यात आले आहेत. या लक्षवेधी पोस्टरने शहरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. पाणी समस्येचा ढोल वाजवून भाजपाला नामोहरम करण्याची ही खेळी विरोधी पक्षांकडून खेळण्यात आल्याचे बोलले जात आहे. मात्र, या पोस्टरखाली एक त्रस्त पुणेकर असा उल्लेख आहे. हे पोस्टर कोणी लावले आहेत, या मागे राजकीय पक्षाचा हात आहे का?, हे अद्याप अस्पष्ट आहे.