पाणी पुरवठ्याची कोणतीही समस्या नसतानाही अधिकार्यांमध्ये संभ्रम
एक दिवसाचे महापौर बनलेल्या उपमहापौर चिंचवडे यांनी सोडले आदेश
पिंपरी-चिंचवड : शहराला केल्या जाणार्या पाणीपुरवठ्यापैकी 30 ते 40 टक्के पाणी गळती होत आहे. त्यामुळे पाणी गळती रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात. त्याकामात चालढकल करणार्या अधिकार्यांवर कारवाई करण्यात यावी, असा आदेश उपमहापौर सचिन चिंचवडे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना महासभेत दिला आहे. दरम्यान, पाणी पुरवठ्याची कोणतीही समस्या नसताना अचानक उपमहापौरांनी असा आदेश दिल्याने पाणी पुरवठा विभागाच्या अधिकार्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या आदेशाचे नेमके प्रयोजन काय? असा प्रश्न अधिकार्यांना पडला आहे.
महापौर परदेश दौर्यावर
परदेश दौ-यावर गेलेले महापौर राहुल जाधव अद्यापही शहरात परतले नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीत उपमहापौर सचिन चिंचवडे यांनी आज झालेल्या सर्वसाधारण सभेचे पीठासन अधिकारीपदाचे कामकाज सांभाळले. सभेला सुरुवात होताच नामदेव ढाके यांनी विशाल कांबळे यांच्या सत्काराचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर सर्व गटनेत्यांच्या उपस्थितीत हा सत्कार समारंभ पार पडला. त्यानंतर विविध क्षेत्रातील मृत्यू झालेल्या मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर शहरातील पाणी पुरवठ्याच्या होणा-या गळतीचा संदर्भ देत प्रकरणी दोषी असलेल्या अधिका-यांवर कारवाई करण्याचे आदेश उपमहापौर सचिन चिंचवडे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिला. पाणी पुरवठा सुरळीत असताना अचानक हा आदेश देण्याचे नेमके प्रयोजन काय? असा प्रश्न पाणी पुरवठा विभागाच्या अधिका-यांना पडला आहे.
पाटबंधारे विभागाचे पत्र
’पाटबंधारे विभागाचे नुकतेच महापालिकेला एक पत्र आले आहे. त्यामध्ये पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची तंबी दिली आहे. शहराला केल्या जाणा-या पाणीपुरवठ्यापैकी 30 ते 35 टक्के पाण्याची गळती होत आहे. त्यामुळे पाणी वाया जात असून भविष्यात पाणीपुरवठ्याच्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे. अधिकार्यांनी गळतीवर लक्ष केंद्रीत करावे. गळती रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात असा आदेश महापौर राहुल जाधव यांनी देऊनही गळती रोखण्यात यश आले नाही. प्रामाणिकपणे काम होत नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पाणी गळती रोखण्यासाठी उपाय योजना न करणार्या अधिकार्यांवर कारवाई करण्याचा आदेश दिला असल्याचे’ उपमहापौर सचिन चिंचवडे यांनी सांगितले.