आमदार दत्तात्रय भरणे यांची सूचना
इंदापूर : तालुक्यात दुष्काळी स्थितीमुळे भविष्यामध्ये पाणी टंचाइचे संकट उभे राहणार आहे. यावर मात करण्यासाठी संबधीत अधिकार्यांनी त्याबाबत उपाय योजना करण्यासाठी आतापासूनच तयारी करावी, अशी सूचना आमदार दत्तात्रय भरणे यांनी संबधीत पाणी पुरवठा विभाग अधिकार्यांना आढावा बैठकीत दिल्या. भरणे यांच्या अध्यक्षतेखाली इंदापूर तालुक्यातील सर्व खात्यातील वरिष्ठ अधिकार्यांची तातडीची बैठक तहसील कार्यालय इंदापूर या ठिकाणी बोलविण्यात आली होती. या बैठकीमध्ये तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती बाबतचा आढावा आमदार दत्तात्रय भरणे यांनी घेतला. यावेळी तहसीलदार सोनाली मेटकरी, इंदापुरचे पोलीस निरिक्षक मधुकर पवार, गटविकास अधिकारी माणिकराव बीचकुले, इंदापुर उपजिल्हा रूग्णालय प्रभारी वैद्यकिय अधिक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे, सार्वजनिक बांधकाम उपअभियंता धनंजय वैद्य, विद्युत उपअभियंता रघुनाथ गोफणे यांच्यासह तालुक्यातील सर्व खात्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
13 अंगणवाड्या निधीसह मंजूर
सहाय्यक गटविकास अधीकारी व्ही. जी. गुळवे यांनी बैठकीत माहिती देताना सांगितले की, सन 2017-18 मधील दलीत वस्ती सुधार योजने अंतर्गत 158 मंजूर कामांसाठी 9 कोटी 25 लाख मंजूर झाले आहेत. त्यापैकी 34 कामे पुर्ण झाली आहेत. 23 कामांची वर्क ऑर्डर नुकतीच काढण्यात आली आहे. 7 कोटी 29 लाखांच्या कामांचे प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हा परिषदेकडे पाठविले आहेत. जिल्हा परिषदेकडील 20 टक्के निधीतील अपंगासाठी 5 टक्के तरतुद केली असून त्यातून 118 घरे मंजूर आहेत. येत्या पाच वर्षांसाठी दलित वस्ती सुधारीत आराखडा तयार असून त्यामध्ये तालुक्यातील नवीन 565 वस्त्यांचा समावेश केला आहे. नवीन 13 अंगणवाड्या मंजूर झाल्या आहेत. त्यांच्या इमारतींसाठी प्रत्येकी 7 लाख निधी मंजूर झाला आहे.
पाणी टंचाईवर प्रस्ताव
तालुक्यातील पाणी टंचाइ विषयी पंचायत समितीच्या वतीने तीन प्रस्ताव इंदापूर तहसील कार्यालयास पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी झगडेवाडीचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. व्याहळी प्रस्ताव मंजूरी विषयी चर्चा सुरू आहे. वकीलवस्ती येथे टंचाईची गरज नसल्याने तो प्रस्ताव सध्या स्थगितत ठेवण्यात आल्याचेही सांगण्यात आले.