चाळीसगाव । संभाव्य पाणी टंचाईवर उपाय योजना करण्यासाठी संबंधीत अधिकार्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावा अशा सुचना आमदार उन्मेश पाटील यांनी दिल्या. संभाव्य पाणी टंचाईवर उपाय योजना करण्याकरीता टंचाई कृती आराखडा तयार करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार ए. टी. नाना पाटील, पंचायत समिती सभापती संजय पाटील, उपविभागीय अधिकारी, शरद पवार, तहसिलदार कैलास देवरे, पंचायत समिती सदस्य आदी उपस्थित होते. या बैठकीत भविष्यात होणार्या पाणी टंचाई निवारण्यासाठी गिरणा धरणावरुन उपाय योजना करणे, बुडक्या घेणे, विहीरींचे खोलीकरण, विंधन विहीरी घेणे, खासगी विहीर अधिग्रहीत करणे, विंधन, दुरुस्ती करणे, पाण्याचे स्त्रोत संपले तर टँकरेद्वारे पाणीपुरवठा करणे आदीबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीस तालुक्यातील सरपंच व ग्रामसेवक, पं.स.चे अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.
पाणी घेण्यासाठी येणार्या अडचणी दूर कराव्यात
अधिकार्यांनी संभाव्य पाणी टंचाई उदभवणार्या प्रत्येक गावात जाऊन सर्वे करावा. टंचाई निवारण्यासाठी कोणत्या उपाय योजना करता येतील याचा आराखडा तयार करावा. ज्या ठिकाणी पाण्याचा स्त्रोत असेल तेथून पाणी घेण्यासाठी येणार्या अडचणी दूर कराव्यात. ज्या गावातील पाण्याच्या टाक्या जुन्या झाल्या असतील त्यांचा तांत्रिक सर्वे करुन नवीन टाक्यांचा प्रस्ताव सादर करावा. पाणी आरक्षीत करण्यासाठी ग्रामसेवक, सरपंच यांनी प्रस्ताव पाठवावा. अशा सुचनाही त्यांनी संबंधीत अधिकार्यांना दिल्या. तसेच कमी जागेत बोरींग करण्यासाठी लहान यंत्रे मिळावी यासाठी जिल्हास्तरावर पाठपुरवा करण्यात येईल. थकीत वीज बिलामुळे पाणी पुरवठ्याची वीज खंडीत होवून पाणी टंचाई निर्माण होते. वीज खंडीत होवू नये यासाठी थकीत वीज बिलातील चालू बिल भरावे, ज्या परिसरात जास्त वृक्ष लागवड आहे त्या परिसरात जास्त पाऊस पडतो, यासाठी पाणी टंचाई होवू नये यासाठी सर्वांनी जास्त प्रमाणात वृक्ष लागवड करावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.