पाणी पातळी घटल्याने हतनुरचे 10 दरवाजे बंद

0

वरणगाव । मध्यप्रदेशात तापी नदी उगमस्थळात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे हतनूर धरणाची जलपातळी वाढली होती त्यामुळे धरणाचे 36 दरवाजे उघडण्यात आले होते. त्यानंतर उगमपरिसरात पावसाने विश्रांती घेतल्याने जलपातळी कमी होऊन 12 दरवाजे बंद करण्यात आले होते. त्यानंतर सोमवार 24 रोजी पुन्हा 10 दरवाजे बंद करण्यात आल्यामुळे चार दरवाजे पूर्ण तर 10 दरवाजे 2 मीटरने उघडण्यात आले आहे. सद्यस्थितीत पाणी पातळी 207.770 मीटरपर्यंत आली असून पाणीसाठा 135.10 दलघमी, विसर्ग 40 क्युसेकने केला जात आहे. तर कालव्यातून 7.08 पाणी तापी नदीत सोडण्यात येत आहे.

आवक वाढल्यास विसर्गही वाढणार
तापी नदीच्या उगमस्थळावर दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती दिल्याने पाण्याचा प्रवाह कमी होऊन धरणाचे दहा दरवाजे बंद करण्यात आले आहे. तापी आणि पूर्णातून आवक वाढल्यास विसर्गाचे प्रमाण वाढेल. 15 ऑगस्टनंतरच्या काळात हतनूर धरणात साठा वाढवण्यात येणार आहे. तोपर्यंत हतनूर धरणात होणार्‍या आवकच्या तुलनेत विसर्ग कायम ठेवला जाणार आहे. हतनूर धरणाच्या पाणलोटक्षेत्रात गेल्या बुधवारी समाधानकारक पाऊस झाला होता. यामुळे धरणाची पातळी वाढली होती. मात्र शुक्रवार 21 रोजी दुपारी 12 ते शनिवारी सकाळी 8.30 वाजेच्या दरम्यान पावसाचा जोर ओसरला आहे. पाणलोटक्षेत्रातील केवळ बर्‍हाणपूर येथे 1.4 मिमी पाऊस झाला तर अन्य ठिकाणी पावसाची उघडीप होती.