पाणी पिण्यायोग्य असल्याचा मनपाचा दावा फोल

0

जळगाव । शहरात पिवळ्या दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा करण्यात येत असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात बोंब असताना दुषित पाणी प्यायल्याने मोठाच गॅसट्रो झाल्याचा रुग्ण शनिपेठ परिसरात आढळला असून जळगाव महानगर पालिकेने केलेल्या पाणी पिण्यालायक असल्याचा दावा खोटा ठरला आहे. गेल्या सात दिवसापासून पाणीपुरवठा करण्यासाठी अडचण निर्माण झाल्याने नागरिकांची मोठी वाताहत झाल्याने शहरात पाण्यासाठी मोठा गदारोळ उडाला होता. नागरिकांनी थेट महापालिकेचे कार्यालय गाठत आपल्या तक्रारीचा पाढा वाचला मात्र पुन्हा एकदा पिवळ्या दुर्गंधीयुक्त पिण्याच्या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आगोदर पाणी मिळत नसल्याने वणवण झाली आता पाणी मिळते आहे. मात्र आरोग्यासाठी धोका दायक अशी परिस्थिती जळगाववासीयांची झाली आहे.

महापालिकेने केली होती तपासणी
मनपाच्या माध्यमातून जिह्यातील प्रयोग शाळेत तसेच नेरी याठिकाणी पाण्याची तपासणी करण्यात आली होती. यामध्ये महापालिकेला केलेल्या प्रक्रियेचा खुलासा करण्यात आल्या नंतर मनपाच्या माध्यमातून शहरवासियांना पाणी पिण्यालायक असल्याच दावा करण्यात आला होता. शनिपेठ परिसरात झालेल्या घटनेनंतर महापालिकेने केलेला दावा फोल ठरला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकर्‍याच्या अधिकार्‍यांनी देखील महिना भरापूर्वी जलशुद्धीकरण केंद्राला भेट दिली होती.

पाण्यातील जिवाणूंमुळे आजाराचा होतोय प्रसार
दूषित व दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे शहरात आजार पसरण्याचा मोठा धोका आहे. यामध्ये अतिसार, गॅस्ट्रो, कावीळ, कॉलरा, विषमज्वर यासारखे अनेक आजाराचा प्रसार होऊ शकतो. पाणी हे जीवन असले तरी त्यातून पसरणार्‍या अनेक आजारांमुळे राज्यभरात दरवर्षी दहा लाखांहून अधिक लोकांना सरकारी रुग्णालयातून उपचार घ्यावे लागले आहेत.जास्त प्रमाणात लोकांना दूषित पाण्याच्या आजारांचा सामना करावा लागला आहे. महत्त्वाचे म्हणजे गेल्या पाच वर्षांत राज्यात दूषित पाण्यामुळे होत असलेल्या आजारांचा प्रसार वाढल्याचे दिसून येत आहे. मलेरिया, डेंग्यू या डासांपासून पसरणार्‍या, तसेच स्वाइन फ्लू या हवेवाटे पसरणार्‍या आजारांच्या साथीपेक्षाही पाण्यातून पसरणार्‍या आजारांच्या साथी या अधिक प्रभावी ठरताना दिसत आहेत. कॉलरा हा एकमात्र अपवाद आहे. गेल्या पाच वर्षांत विशेषत दोन वर्षांपासून कॉलराच्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे.

उद्या होणार पुरवठा
वाल्मिक नगर, खोटे नगर, हरीविठ्ठल नगर, प्रिप्राळा परिसर, देवेद्र नगर, मोहाडी रोड, जीतेद्र नगर यांच्या सह इतर परिसरात मनपाच्या वतीने पुरवठा करण्यात येणार असून नागरिकांच्या तक्रारी आल्यास मनपाच्या केमिस्ट अधिकार्‍याना कळविणार आल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे बी.एस खडके यांनी दिली आहे.

येथे झाला पुरवठा
एकाच वेळी शहराच्या परिसरात पाणी सोडल्याने कमी दाबाने पाणी येत होते. त्यामुळे बर्याच नागरिकांना पुरवठा करून देखील पाणी मिळाले नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या असून नटराज थेटर, बळीराम पेठ, शनिपेठ, जुने जळगाव,शाहूनगर ,सुप्रीम कॉलनी ,आयोध्या नगर,रिंग रोड, समता नगर, नवीपेठ, जयकिसन वाडी, शाहूनगर या संपूर्ण परिसरात आज पाणी पुरवठा करण्यात आला. पण पिवळे पाणी येणे सुरूच असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे.

आणि अनर्थ टळला
शनिपेठ परिसरात शनी मंदिरासमोर राहणार्‍या संजय जगन्नाथ शिंदे (वय 51) यांना मध्यरात्री 3 वाजता अचानक चक्कर असल्याने ते जमीनवर आद्ळले गेले. यामध्ये त्यांना गंभीर दुखापत झाली. पोटाचा त्रास होत असल्याने नातेवाईकाना लक्षात आल्या नंतर बेशुद्ध अवस्थेत पाउसाच्या जोरदार सरी कोसळत असताना जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरातील भंगाळे रुग्णालयात त्यांना दाखल करून तत्काळ त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले. डॉक्टराच्या तपासणी नंतर दुषित पाणी प्यायल्याने त्यांना गॅसट्रो झाल्याचे निदर्शनास आले. नातेवाइकानी सावधानता बाळगत त्यांना रुग्णालयात दाखल केल्याने पुढील अनर्थ टळला आहे.