पाणी पुरवठेच्या नावाखाली रस्ते खोदाई

0

पिंपरी- पाणीपुरवठा योजनेसाठी पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागात रस्ते खोदाई करण्यात आली आहे. पावसाळा सुरु झाला तरी हे रस्ते खोदाईचे काम सुरुच आहे. ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे काम रेंगाळले असून याचा फटका नागरिकांना बसत आहे. खोदाईमुळे अपघातामध्ये वाढ झाली आहे. भर पावसाळ्यात रस्ते खोदाईस परवानगी कशी दिली ? असा संतप्त सवाल शिवसेनेचे नगरसेवक व स्थायी समिती सदस्य अमित गावडे यांनी उपस्थित केला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीची साप्ताहिक सभा आज (बुधवारी) पार पडली. या सभेत रस्ते खोदाईवरुन शिवसेना नगरसेवक अमित गावडे यांनी प्रशासनाला फैलावर घेतले. गावडे म्हणाले, “शहराच्या विविध भागात २४ तास पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी रस्त्यांची खोदाई केली आहे. पावसाळ्यापूर्वी खोदाईचे काम पूर्ण करणे गरजेचे होते. परंतु, तसे होताना दिसत नाही”

“24 तास पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण होत नाही. एखादा विभाग घेऊन काम पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. परंतु, पालिका तसे करत नाही. मे महिन्यापर्यंत खोदाईस परवानगी दिली जाते. परंतु पावसाळा सुरु झाला तरी खोदाईस पालिका प्रशासनाकडून परवानगी दिली जात आहे. पावसाळा सुरु झाला आहे. त्यातच रस्ते खोदल्यामुळे नागरिकांना चालणे मुश्किल होत आहे. अपघातांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या पाच दिवसात प्राधिकरणात आठ अपघात झाले आहेत. यामध्ये दुर्देवाने एखादी अप्रिय घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण ?” असा सवालही गावडे यांनी उपस्थित केला. तसेच लवकरच लवकर खोदाई केलेले काम पूर्ण करण्यात यावे, अशी सूचना देखील त्यांनी प्रशासनाला केली.

आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, “अमृत योजनेअंतर्गत 24 तास पाणीपुरवठा योजनेचे काम सुरु आहे. विशेष योजनेचे काम असल्यामुळे खोदाईस परवानगी देण्यात आली आहे. 15 दिवसात काम पूर्ण करण्यात येईल. तोपर्यंत पूर्ण न झाल्यास खोदाई बंद केली जाईल”