इंदापूर । पाणी न देता इंदापूर तालुक्यात शेतकर्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. पाण्याचे नियोजन अधिकार्यांचे जरी असले तरी अधिकार्यांवर लोकप्रतिनिधींचा वचक नसेल, तर शेतकर्यांना कसे पाणी मिळणार असा सवाल करीत माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांच्यावर नाव न घेता टीका केली. निरवांगी (ता. इंदापूर) येथे 22 गावांच्या पाणी प्रश्नाबाबत आयोजित सभेत ते बोलत होते.
उन्हाळ्यातील पाणी गेले कुठे?
चार वर्षांपासून उन्हाळ्यात मिळणारे पाणी गेले कुठे? असा सवाल त्यांनी केला. उपोषण करून सुद्धा नीरा नदीत पाणी सोडले नाही. बारामती तालुक्यात दुसरे आवर्तन सुरू असून, इंदापूर तालुक्यात मात्र मोठे क्षेत्र पाण्यापासून वंचित राहिले आहे. सध्या पाण्याच्या बाबतीत जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला असून, संघर्ष करण्याची वेळ आली आहे. सणसर कट भागात 400 क्युसेस पाण्याचा गेज लागलाच पाहिजे तरच या भागातील आवर्तन व्यवस्थित होऊ शकेल, असे ते म्हणाले.
हक्काचे पाणी या भागासाठी मिळणे जरूरीचे
नीरा भीमाचे चेअरमन लालासाहेब पवार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ड. कुष्णाजी यादव, पंचायत समितीचे माजी सभापती विलास वाघमोडे, जयकुमार कारंडे, शिवाजी पोळ, हनुमंत कदम, दत्तात्रय पोळ, गोविंद रणवरे, राजेंद्र भाळे व शेतकरी उपस्थित होते. पाटील म्हणाले, भागातील सुमारे 4200 एकर क्षेत्र पाणी पाण्यावाचून दीड महिन्यापासून जळत आहे. भाटघर धरणातून 3.02 तर खडकवासल्याचा सणसर कटमधून 3.04 टी.एम.सी. असे 7 टी.एम.सी. हक्काचे पाणी या भागासाठी पाणी मिळणे जरूरीचे आहे. आपल्या काळात सणसर कटमधून 2 टीएमसी पाणी मिळत होते.