पाणी प्रश्‍न झुलवत ठेवण्यातच राजकारण्यांना रस – प्रा. परांजपे

0

13व्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त वार्तालाप

पुणे : खरेतर पाण्याची उपलब्धता या समस्येबरोबर त्या समस्येला प्राप्त झालेले राजकीय महत्त्व ही अधिक गंभीर समस्या आहे. राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी ही समस्या सुटत नाही. कारण हा मुद्दा राजकीय झाल्यामुळे तो खेळवत आणि झुलवत ठेवण्यातच राजकारण्यांना स्वारस्य आहे, अशी परखड टिका यंदाच्या वसुंधरा जीवनगौरवचे सन्मानार्थी तेसच पाणी संस्कृती आणि नद्या यांचे तज्ज्ञ आणि महाराष्ट्र शासनाच्या जल नियोजन समितीचे माजी अध्यक्ष प्रा. विजय परांजपे यांनी केली.

13व्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त पत्रकार भवन येथे प्रा. विजय परांजपे, यंदाच्या वसुंधरा पर्यावरण पत्रकारच्या सन्मानार्थी पत्रकार राखी चव्हाण आणि बंगळुरूचे नामवंत छायाचित्रकार सचिन राय यांच्याशी विशेष वार्तालाप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी परांजपे बोलत होते. यावेळी 13 व्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या संयोजक सुप्रिया चित्राव उपस्थित होत्या.

पाण्याचा अपव्यय वाढला

पाणी मिळविण्यासाठीचे अधिकार आपल्या सगळ्यांना माहिती आहेत, मात्र त्या अधिकारांबरोबर येणार्‍या जबाबदार्‍या आणि कर्तव्ये याबाबतीत आपण नेहमीच दुर्लक्ष करतो. आपल्याला गरजेपेक्षा जास्त मिळालेल्या पाण्याचा आपण अपव्यय करतो, हेच कोणी लक्षात घेत नाही. त्याचबरोबर आपण प्रदुषित केलेले पाणी नद्या आणि ओढ्यांमध्ये जाऊन पुढील गावांना पोहोचते आणि तिथल्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. आपल्याकडे समान पाणी वाटप होत नसल्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. ज्या मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे, त्या मराठवाड्यात जास्त पाणी लागणारे ऊसासारखे पीक घेतले जाते. तिथे साखर कारखाने निर्माण होतात. हा विरोधाभास चिंताजनक आहे. उपलब्ध पाणी आणि त्यावर आधारीत उद्योगधंदे याचे योग्य नियोजन दिसून येत नाही, असे प्रा. विजय परांजपे यांनी सांगितले.

पर्यावरणाबाबत जागरूकता झाली पाहिजे

धोरणकर्त्यांवर अंकुश ठेवण्याची ताकद पत्रकारितेमध्ये आहे. त्याचा योग्य वापर करून आपण पर्यावरण संवर्धनास हातभार लावू शकतो. मुंबईमधील एका संस्थेने आपला राज्यपक्षी बदलण्याचा घाट घातला होता, पत्रकारितेच्या माध्यमातून मी त्यांचा हा डाव हाणून पाडला होता. पर्यावरणाविषयी लोकांच्या मनात आवड आणि आत्मीयता निर्माण झाली असली, तरी त्याबाबतीत जागरूकता मात्र निर्माण झालेली दिसत नाही. पर्यावरणाविषयी संवेदना असणार्‍यांची संख्या खूप असली, तरी प्रत्यक्ष काम करायला कोणी सहज तयार होत नाही, असे पत्रकार राखी चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

पाण्याची योग्य साठवणूक केली पाहिजे

अलीकडे जलयुक्त शिवार योजनेचा बोलबाला केला जातो, मात्र ही योजना राबविण्यात आलेल्या 43 हजार गावांपैकी केवळ दोन हजार गावे या योजनेमुळे खर्‍या अर्थाने जलयुक्त झाली आहेत. या कासवगतीने आपण काम केले तर पाण्याच्या बाबतीत गावांना स्वयंपूर्ण बनविण्यासाठी अनेक वर्षांचा कालावधी लागेल आणि तोपर्यंत वेळ हातातून निघून गेलेली असेल. पाण्याची योग्य साठवणूक आणि वापर याबाबतीत आपण राजस्थान आणि गुजरातमधील जुनागडचा आदर्श घेण्याची गरज आहे. तिथले लोक पावसाळ्यात आपल्या तळघरात साठवलेले पाणी वर्षभर वापरतात, आपणही अशा प्रकारे पुढाकार घेतला पाहिजे, असे परांजपे यांनी पुढे सांगितले.

दुर्दैवाने अजूनही भारतामध्ये वाईल्ड लाईफ फोटोग्राफी हे क्षेत्र करिअरचे क्षेत्र झालेले नाही. आपल्या अर्थार्जनासाठी वेगळा पर्याय निर्माण करूनच आपण या क्षेत्रात काम करू शकतो. केवळ छंद आणि हौस म्हणून वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करता येत असल्यामुळे अनेक चांगल्या छायाचित्रकारांना देखील अर्थार्जनासाठी वेडींग फोटोग्राफी, कमर्शियल फोटोग्राफी करावी लागते, असे नामवंत छायाचित्रकार सचिन राय यांनी यावेळी बोलताना सांगितले.