नंदुरबार ।सं पूर्ण जगात आज पाण्याची भीषण टंचाई निर्माण निर्माण झालेली आहे. पाण्यामुळेच तिसरे महायुद्ध होणार असल्याचे बोलले जाते. सर्वच जन पाण्यासाठी वणवण फिरत आहेत. म्हणून गावाच्या खर्या अर्थाने विकास साध्य करायचा असल्यास सर्वांनी पाणी बचतीला महत्त्व देण्याची गरज असल्याचा सूर ठाणेपाडा ता. नंदुरबार येथे पानी फाउंडेशन तर्फे आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप प्रशिक्षण कार्यशाळेत उमटले. पाणी फाउंडेशनतर्फे सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धेसाठी नंदुरबार व शहादा या दोन तालुक्याची निवड करण्यात आली. शनिवार 10 फेब्रुवारी रोजी नंदुरबार तालुक्यातील भालेर, न्याहली,आसाणे, होळ तर्फे हवेली, बिलाडी, तलावडी खुर्द,अंबापूर या गावांमधील प्रतिनिधींसाठी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. चार दिवस प्रशिक्षण होणार आहे. त्याचे उद्घाटन सरपंच भारती देवमन पवार यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले.
8 एप्रिल ते 22 मे स्पर्धा
त्याप्रसंगी उपसरपंच काशिनाथ पवार, सरपंच संघटनेचे अध्यक्ष देवमन पवार, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त यशवंत पवार, माजी सरपंच काशिनाथ पवार, ग्राम विकास अधिकारी विजय होळकर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रसंगी पाणी फाउंडेशन प्रशिक्षक सुखदेवराव भोसले यांनी सांगितले की, पानी फाऊंडेशन ही संस्था जलसंधारण आणि पाणलोट व्यवस्थापनाची उत्तम कामगिरी करणार्या वेगवेगळ्या गावांमध्ये सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धेचे आयोजन करीत आहे. 8 एप्रिल ते 22 मे दरम्यान स्पर्धेच्या कालावधी राहणार आहे.
75 लाखांचे पहिले बक्षीस
राज्यपातळीवर पहिलं बक्षीस 75 लाख रुपये, दुसरे बक्षीस 50 लाख रुपये व तिसरे बक्षीस 40 लाख रुपयांचे असून प्रत्येक तालुक्यातील सर्वोत्तम कामगिरी करणार्या गावाला 10 लाखाचं रोख बक्षीस दिलं जाईल. राज्यातील 75 गावांमध्येही खुली स्पर्धा आहे. त्यात नंदुरबार व शहाद्याच्या समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सरपंच संघटनेचे अध्यक्ष देवमन पवार यांनीही मनोगत व्यक्त केले. यशस्वीतेसाठी उत्तर महाराष्ट्र व्यवस्थापक दयानंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सुखदेवराव भोसले, महानंद मोरे, सीमा पाडवी, उज्वला काळे, सुनील वाघ, चंद्रभान खेताळे, निलेश पगारे, सुरेश पावळे, राहुल गोवडे आदि प्रयत्न करीत आहेत.
65 वर्षीय सरूबाईंचा सहभाग
भालेर,न्याहली, आसाणे, बिलाडी, होळ तर्फे हवेली,तलावडे खुर्द अंबापुर या गावांतील प्रतिनिधींची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली असून सकाळी 11 वाजता त्यांचे गावात आगमन झाल्यानंतर पाणी फाउंडेशन च्या सदस्यांनी त्यांची सवाद्य मिरवणूक काढली. महिला कार्यकर्त्यांनी प्रत्येकाचे औक्षण केल्याने प्रशिक्षणार्थी भारावले होते. या प्रशिक्षणात 65 वर्षीय सरूबाई पाटील रा. भालेर यांनीही सहभाग नोंदवल्याने त्यांचे कौतुक करण्यात आले.