पाणी येत नसल्याची तक्रार करणाऱ्यांना पिंपरी-चिंचवडच्या नगरसेवक कार्यकर्त्यांकडून मारहाण

0

पिंपरी- पिंपरी-चिंचवड मधील भाजपा नगरसेवक तुषार कामठे यांच्या कार्यालयात प्रभागातील एका कुटुंबीयांनी पाणी येत नसल्याची तक्रार केली. याचा राग येऊन नगरसेवक कामठे यांच्या कार्यकर्त्यांनी त्या कुटुंबियांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नगरसेवक तुषार कामठे यांच्या कार्यकर्त्यांविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुटुंबप्रमुख संतोष दोडके यांनी पाणी येत नसल्याची तोंडी तक्रार नगरसेवक कामठे यांच्या जनसंपर्क कार्यालयात केली होती. त्यानंतर गुरुवारी रात्री साडे आठच्या सुमारास कुटुंबाला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

फिर्यादी संतोष लक्षण दोडके (४३ रा.पिंपळे निळख) हे गेल्या काही वर्षांपासून पिंपळे निळख येथे राहत आहेत. गुरुवारी दसऱ्याच्या दिवशी कमी दाबाने पाणी येत होते. त्यामुळे फिर्यादी संतोष दोडके हे तुषार कामठे यांच्या जनसंपर्क कार्यालयात गेले होते. कार्यालयात बसलेल्या अमोल कामठे याला पाणी येत नसल्याची तोंडी तक्रार संतोष दोडके यांनी केली. त्यानंतर ते जनसंपर्क कार्यालयातून निघून गेले.

रात्री साडे आठच्या सुमारास दोडके कुटुंब हे जेवणासाठी बसले असता तुषार कामठे यांचा ड्रायव्हर गणेश याने संतोष दोडके यांना खाली बोलावून घेतले आणि तुम्ही दरवेळेस पाण्यासाठी कार्यालयात येऊन तक्रार का करता असं विचारच लाथा बुक्क्यांनी मारण्यास सुरुवात केली. आरडाओरडा ऐकून मुलगा प्रणिकेत आणि पत्नी सारिका इमारतीच्या पार्किंगमध्ये आले. प्राणिकेतने वडील संतोष दोडके यांना वाचण्याचा प्रयत्न केला असता त्याला विशाल कामठे याने लाकडी दांडक्याने छातीत मारले. यात तो गंभीर जखमी झाला आहे. तसेच त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. तर संतोष दोडके यांच्या पत्नीला प्रतीक दळवी याने मारहाण केली अस फिर्यादीत म्हटलं आहे.

याप्रकरणी अमोल कामठे, विशाल कामठे, प्रतीक दळवी, गणेश व इतर पाच जणांविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी तिघांना सांगवी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

ही त्यांची वैयक्तिक भांडण आहेत. यात राजकीय विषय नाही. जनसंपर्क कार्यालयात भांडण झाले नसून ते त्यांच्या घरी झाले आहे. भांडणासोबत माझा संबंध नाही. फिर्यादी सचिन दोडके हा काँग्रेस शहराध्यक्षांचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण मिळत आहे, असं भाजपा नगरसेवक तुषार कामठे यांनी सांगितले आहे.