पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून सल्लागारांवर पैशांची उधळपट्टी सुरूच आहे. आता अमृत अभियानांतर्गत पाणी पुरवठा योजना राबविण्यासाठी निविदा पूर्व आणि निविदा पश्चात कामांसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यापोटी त्यांना चार कोटी 13 लाख रूपये देण्यात येणार आहेत. पाणीपुरवठा गळती कमी करण्यासाठी जेएनएनयुआरएम अंतर्गत 40 टक्के भागासाठी 24 तास पाणीपुरवठा योजना राबविण्याचे काम सुरू आहे. तसेच अमृत अभियानांतर्गत उर्वरीत 60 टक्के भागामध्ये पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करणे या प्रकल्पाचे काम चार टप्प्यात सुरू आहे.
चिखलीच्या जलशुद्धीकरणासाठी निवीदा…
जेएनएनयुआरएम प्रकल्पाचे नियोजन 2014 पूर्वी करण्यात आले होते. अमृत अभियानाचे नियोजन 2016 पूर्वी झाले आहे. किवळे, मामुर्डी, वाकड, चर्होली, वडमुखवाडी, डुडुळगाव, चिखली हा समाविष्ट ग्रामीण भाग वेगाने विकसित होत आहे. या भागातील पूर्वी विकसित नसलेल्या काही भागाचा समावेश प्रकल्पाअंतर्गत नव्हता. त्यामुळे या भागासाठी नव्याने नियोजन करावे लागणार आहे. चिखली येथे 100 एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र बांधण्यासाठी निविदा काढण्यात आली आहे. देहू बंधार्यातून चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाईपलाईनने पाणी आणण्याच्या कामाची निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू आहे.
हे देखील वाचा
भविष्यातील पाणीपुरवठ्यासाठी सल्लागार…
पवना खोरे आणि इंद्रायणी खोरे यांचा विचार करता मुख्य जलवाहिनीची कामे करावी लागणार आहेत. या भागातील 2020 नंतरच्या लोकसंख्येस व्यवस्थित पाणीपुरवठा होऊ शकेल, या पार्श्वभूमीवर अमृत अभियानांतर्गत शहरातील उर्वरीत 60 टक्के भागामध्ये पुरेशा दाबाने पाणीपुरवठा योजना राबविणे तसेच भविष्यात विकसित होणार्या भागासाठी पाणीपुरवठा योजना राबविणे या कामासाठी सल्लागार नेमण्यात येणार आहे. डीआरए कन्सल्टंट यांनी निविदापूर्व कामांसाठी 48 लाख 26 हजार रूपयांचे दरपत्रक दिले आहे. नव्या समाविष्ट भागाची सविस्तर प्रकल्प अहवालाची (डीपीआर) किंमत सुमारे 210 कोटी आहे. त्यानुसार, निविदापूर्व कामाची रक्कम डीपीआर रकमेच्या 0.23 टक्के येत आहे. तसेच उर्वरीत 60 टक्के भागामध्ये पुरेशा दाबाने पाणी पुरवठा योजना राबविणे या कामासाठी पूर्वमान्य दर 3 कोटी 64 लाख 80 हजार रूपये इतका येत आहे.