जुन्नरजवळील तांबे गावात पाच पाझर तलावांचे भूमिपूजन
जुन्नर : पाण्याचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन व वापर न केल्यास भविष्यात भीषण पाणीटंचाईस सामोरे जावे लागणार असल्याचा इशारा केंद्रीय जलसंधारण सुकाणू समितीचे सदस्य व हिवरे बाजारचे आदर्श सरपंच पोपटराव पवार यांनी दिला आहे. जुन्नर तालुक्यातील दुर्गम व आदिवासी भागातील तांबे येथे विविध विकासकामांच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी माजी प्रांतपाल व डिस्ट्रीक्ट फाउंडेशनचे दीपक शिकारपूर, फार इस्टचे प्रेसिडेंट हरपाल नारंग, प्रवीण खंडाळकर, राजकुमार मगर, नरेंद्र छाजेड, कमल कौर, हर्षाली संघवी, सुजीत दोषी, भरत जैन, रोटेरीअन महिला सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते.
तांबे ग्रामस्थांना मिळणार शुद्ध पाणी
सुमारे 2600 लोकसंख्या असलेल्या या गावांतील विकास पाहून पोपटराव पवार यांनी गावकर्यांचे व विशेषतः रोटरी क्लबचे भरभरून कौतुक केले. मागील वर्षी केलेल्या पाच पाझर तलावांचे जलपूजन, वॉटर एटीएमचे उद्घाटन आणि सहाव्या पाझर तलावाचे भूमिपूजन पोपटराव पवार यांच्या हस्ते करण्यात आले. सुमारे 4 लाख रुपये किंमतीच्या वॉटर एटीएममुळे तांबे गावातील लोकांना फक्त 5 रुपयांत 20 लिटर शुद्ध पाणी पिण्यास मिळणार असल्याचे या प्रकल्पाला आर्थिक सहाय्य करणारे बाळकृष्ण होनराव यांनी सांगितले.
1.20 कोटींची विकासकामे
गावाचा विकास होत असताना पारदर्शक व्यवहार, ग्रामस्थांचा सहभाग आणि व्यसनमुक्त युवक पिढी या तीन बाबी अतिशय महत्त्वाच्या असल्याचे पवार यांनी सांगितले. रोटरी क्लब ऑफ पुणे फार इस्टने दत्तक घेतलेल्या तांबे गाव व परिसरात गेली चार वर्षांपासून शाळेची इमारत, ई-लर्निंग सुविधा, वाचनालय, 40 शौचालयांसाठी निधी, साठवण बंधारे, आरोग्य मेळावे, धुरमुक्त स्वयंपाकघर आदी सुमारे 1.20 कोटींची विकासकामे केल्याची माहिती पंकज पटेल यांनी दिली.
शेतीपूरक उद्योगांकरीता मदत
कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचाविण्यासाठी युवकांना शेतीपूरक उद्योगांकरिता रोटरीकडून भरीव मदत देण्याची घोषणा माजी प्रांतपाल दीपक शिकारपूर यांनी केली. याप्रसंगी सरपंच किसन रावते, शिवाजी मडके, रवींद्र तळपे, जुन्नर रोटरीचे भरत चिलप, तुषार लाहोरकर, विजय कोल्हे, सुनील मिंढे, विनोद भागवत, तान्हाजी मिंडे, यशवंत मडके, विठ्ठल लोहकरे, भास्करराव पानसरे, अरुण मातेले, युवराज जोशी, संजय मडके, ग्रामस्थ व शिक्षकवृंद उपस्थित होते. तर बाबुराव मडके यांनी आभार मानले.