पाण्याचा वापराबाबत जलसाक्षरताही आवश्यक

0

जळगाव । महाराष्ट्र शासनाने राबविलेले जलयुक्त शिवार अभियान हे महाराष्ट्राला निश्चितच दुष्काळमुक्तीकडे नेणारे आहे. मात्र जलयुक्त शिवार अभियान राबवत असतांना साठवलेल्या पाण्याचा वापर करण्याविषयी जलसाक्षरताही आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ जलतज्ज्ञ राजेंद्रसिंग यांनी केले. यावेळी व्यासपिठावर राज्याचे महसुल व जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील, आमदार एकनाथराव खडसे, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. पी.पी.पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उज्वला पाटील, महापौर नितीन लढ्ढा, अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मोहम्मद हुसेन खान, खासदार ए.टी.पाटील, खासदार रक्षाताई खडसे, आमदार हरिभाऊ जावळे, आमदार संजय सावकारे, आमदार सुरेश भोळे, आमदार किशोर पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार स्मिताताई वाघ, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे, सहाय्यक जिल्हाधिकारी जलज शर्मा, मनिषा खत्री, मनपा आयुक्त जीवन सोनवणे जलसिंचन आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. माधवराव चितळे, कोल्हापूरचे स्वच्छता दूत भारत पाटील, हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी व जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक, कृषि सहाय्यक, कृषि सेवक यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

पाण्याचा सम्मान करण्याचे आवाहन
पाणी परिषदेत सिंग बोलत मार्गदर्शन करतांना म्हणाले की, पाणी साठवण व सार्वजनिक वापराबाबत आपल्या देशाला चांगला इतिहास होता. मात्र काळ बदल सुरु असल्याने त्याचे संस्कार नष्ट झाले असल्याची कबुली राजेंद्रसिंग यांनी दिली, पाणी नसले तर जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता अधिक असते यामुळे आपण पाण्याचा सन्मान केला पाहिजे. पाण्याचा वापर सांभाळून केल्यास त्याला भवितव्य असून पिकपद्धती, पाऊस पडण्याची पद्धतीचा आभ्यास घेतला पाहिजे. पाण्याचे नियोजन आणि वापर समजून घेत असतांना ज्ञान घेणे आवश्यक असल्याने महाराष्ट्र शासनाने जलसाक्षरतेचे अभियानही राबविले पाहिजे. तसेच उपस्थिती असलेल्या नागरिकांची विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली.

सरपंचांनी पुढाकार घ्यावा- पोपटराव पवार
विकासकामे ही केवळ आदर्श गावाचा मान मिळविण्यापुरती मर्यादीत न ठेवता गांवकर्‍यांना संपुर्ण मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी असावीत, त्यासाठी सरपंचानी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी केले. ते म्हणाले की, गावामध्ये कुर्‍हाडबंदी, चराईबंदी, नशाबंदी, नसबंदी आणि श्रमदान ही पंचसुत्री अंमलात आणल्यास गावाचा विकास कुणीच थांबवू शकत नाही. यावेळी पाणी परिषदेचे उद्घाटन रिमोटद्वारे शेतकरी कुटूंबाच्या हातातील कुंभातून पाण्याचीधार सुरु करुन करण्यात आले. तसेच उपस्थित जलतज्ज्ञांचे स्वागत पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी केले तर स्वागत जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केले.

जिल्हा हागणदारीमुक्त झाल्यास कार्यशाळा यशस्वी – भारत पाटील
स्वच्छ भारत अभियानासाठी आजही आपल्याला कार्यशाळा आयोजित करावी लागते, ही बाब खेदाची असल्याचे नमूद करुन स्वच्छतादूत भारत पाटील यांनी जिल्हा हागणदारी मुक्त झाला तरच ही कार्यशाळा यशस्वी होईल असे सांगितले. संपुर्ण जळगांव जिल्हा 100 टक्के हगणदारी मुक्त झाल्यास कार्यशाळेचे खर्या अर्थाने फलीत होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. कार्यशाळेत सहभागी सरपंच, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांच्यात चैतन्य निर्माण होईल, असे विविध उदाहरणे देऊन स्वच्छतादूत भारत पाटील यांनी दाद मिळवली.

पाण्याची कुशलता आत्मसात करा – डॉ.चितळे
माजी जलसिंचन आयोगाचे अध्यक्ष डॉ. माधवराव चितळे यांनी पाणी परिषद संबोधताना पाण्याच्या पुढच्या पिढीसाठी उपयुक्त कसे ठरले. यासाठी उपाय योजना होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. पुढे बोलताना महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या जलयुक्त शिवार अभियानात पाणी अडविण्याच्या सर्व उपचारांवर भर दिला आहे. लोकसहभागातून योजना साकार करण्यात आली आहे. .जळगाव मध्ये तापमानामुळे बाष्पी भवन मोठ्या प्रमाणावर होते. 2200 ते 2500 पर्यत होणारे बाष्पी भवन होण्यापासून पाण्याचा बचाव करणे गरजेचे आहे. शहरात नेहमी तापमान असल्याने वापरलेले पाणी पुर्नर वापरात कसे आणता येईल यासाठी नियोजन केल्याने ते शक्य आहे. पाण्याचा बचाव करण्याची अनेक उदाहरणे डॉ माधवराव चितळे यांनी दिली, पाण्याचे व्यवस्थापन औद्योगिक आणि शेती व्यवसायासाठी झाले पाहिजे. औद्योगिक क्षेत्र जळगाव मध्ये चांगल्या प्रमाणात असून व्यवस्थापनाचा फायदा त्यासाठी होणार असा सल्ला डॉ.चितळे यांनी दिला. पाण्यासंदर्भात शैक्षणिक धोरण सरकारने आणल्यास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सरकारला त्यांनी साकडे घातले. व शालेय शिक्षणापासून, विद्यापिठांपर्यंत पाणी या विषयावरील अभ्यासक्रम राबविणे आवश्यक असे सांगितले.

जलदूत म्हणून काम करा
पाणी परिषदेतून मिळणारे ज्ञान संपादन करुन आपण आपल्या भागात जलदूत म्हणून जावे व जलजागृती करावी, असे आवाहन राज्याचे महसुल, जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यातील सरपंच, ग्रामसेवक, कृषिसेवक यांना केले. परिषदेच्या आयोजनामागील भुमिका सांगतांना ना. पाटील म्हणाले की, एकीकडे पाणी अडवून ते साठविण्याचे काम करतांनाच, पाणी वापराविषयीचे धोरण ठरविणे महत्त्वाचे आहे. हे करतांना ठिबक सिंचनाचा वापर करुन पाण्याची बचत आणि शेतीचे उत्पन्नात वाढ करण्याचे धोरण अवलंबले पाहिजे.