पुणे । पुणे जिल्ह्यासह जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाने तळ ठोकून असून गेल्या तीन चार दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर पाऊस पडत आहे. शहराला पाणीपुरवठा करणार्या खडकवासला धरणातून मंगळवारी सायंकाळी 4 हजार 280 क्ुयुसेक्सने पाणी विसर्ग सोडण्यात आला होता. तसेच पानशेत धरणातून 2 हजार 834 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू होता. रात्री 11 नंतर पाण्याचा विसर्ग वाढविण्याची शक्यता असल्याचे संबंधित अधिकार्यांनी सांगितले. दरम्यान खडकवासला धरण साखळीत 91.96 टक्के पाणीसाठा झाला आहे. खडकवासला प्रकल्पातील पानशेत आणि खडकवासला धरण 100 टक्के भरले आहे. तर वरसगाव धरण 97.8 टक्के भरले असून ते लवकरच भरण्याच्या मार्गावर आहे.
सर्तकतेचा इशारा
खडकवासला धरणसाखळी प्रकल्पाची एकूण क्षमता 29.15 टीएमसी असून 26.81 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पुणे आणि पिपरी चिंचवड शहरांना पाणीपुरवठा करणारी धरणे भरली असून नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मंगळवारी दिवसभरात खडकवासला धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण 2 मिमी, पानशेत 13 मिमी, वरसगाव धरणात 14 मिमी तर टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 26 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
चार धरणे 100 टक्के
पुणे जिल्ह्यात सर्वदूर पाऊस पडत असून जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पाणीसाठा वाढला आहे. मुळशी, चासकमान धरण 100 टक्के, डिंबे 98.89 टक्के, भामा आसखेड, निरादेवधर 100 टक्के, उजनी 93.55 टक्के पाणीसाठा झाला आहे.
धरणाचे नाव पाणीसाठा विसर्ग
(टीएमसी मध्ये) (क्युसेक्स)
खडकवासला 1.97 4280
पानशेत 10.65 2834
वरसगाव 11.45 —
टेमघर 1.74 —
पवना 8.51 4570
चासकमान 7.57 2768
डिंबे 12.31 7735
मुळशी 18.46 25000
निरा देवधर 11.73 12065
भामा आसखेड 7.67 10964