वरुळ । परिसरात पाण्याच्या पातळीत मोठया प्रमाणात घट झाल्याने शेतकरी उन्हाळी पीक वाचवण्यासाठी धडपड करीत आहे. वरुळ,भटाणे,तर्हाड कसबे,अभानपूर परिसरात जास्त प्रमाणात बागायती क्षेत्र आहे.बोरवेलद्वारे शेती बागायत केली जाते.यावर्षी समाधानकारक पाऊस होऊन सुद्धा पाण्याच्या पातळीत वाढ झाली नाही. रब्बी हंगामात काही प्रमाणात पीक घेतली परंतु उन्हाळी पिके पूर्णतः धोक्यात आली आहेत. हाताशी आलेली पीकाचे उत्पन्न पाण्याअभावी कमी होईल या विवंचेत शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
पाण्याअभावी शेतकर्यांसमोर मोठे संकट उभे राहण्याची शक्यता आहे. सद्या मोठ्या प्रमाणात जमिनीतील पाण्याची पातळीत घट होत आहे. पीक समोर उभे असतांना पाण्याअभावी शेतकरी हतबल होतांना दिसत आहे.परिसरातील भटाणे गावात तर आतापासूनच पिण्याचं पाण्याची टंचाई जाणवत आहे.तीन चार बोरवेल करून सुद्धा पाणी लागले नाही.भटाणे गावात आतापासूनच चार पाच दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो.परिसरात सुद्धा भटाणेसारखी परिस्थिती उद्धभवण्याची शक्यता आहे. परिसरातील काही शेतकर्यांचे बोरवेल पुर्णपणे बंद झाले आहेत. तर काही शेतकर्यांकडे थोड्याफार प्रमाणात बोरवेलला पाणी आहे ते सुद्धा हातातील पीकांना पुरणार नाही म्हणून पीक कोणत्या पद्धतीने वाचवावे या दुविधा मनस्थितीत शेतकरी असल्याचे दिसून येते.