पिंपरी-चिंचवड : पाणी हे जीवन आहे. पाण्याचा काटकसरीने वापर करून त्याची बचत करणे काळाची गरज आहे. पाण्याचे महत्त्व ओळखून पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत करणार्या विविध संस्थांच्या कार्याची दखल घेऊन रोटरी डिस्ट्रीक्ट पुणे 3131 ने अशा संस्थांचा गौरव केला.
पाण्याची बचत करणार्या शहरातील सात संस्थांना रोटरी डिस्ट्रिक्ट पुणे 3131 च्या वतीने ‘रोटरी वॉटर पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. हा समारंभ नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. या समारंभाला मराठवाड्यातील साखर उद्योगाला नवी दिशा देणारे बी. बी. ठोंबरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. बी. बी. ठोंबरे यांच्या हस्ते संस्थांना पुरस्कार प्रदान करण्यात आले, अशी माहिती पुरस्काराचे संयोजक सतीश खाडे यांनी दिली.
संस्थांना प्रथमच मिळाला पुरस्कार
रोटरीच्या वतीने हा पुरस्कार पाणी संवर्धन, पाणी बचत, पाणी पुनर्वापर आणि पाणी गुणवत्तेसाठी काम करणार्या कंपन्यांना देण्यात आला. अशा प्रकारचा पुरस्कार प्रथमच कंपन्यांना देण्यात आला आहे. दॅटवायलर फार्मा पॅकेजिंग प्रा.लि., विपणन अॅनॅलिटीकल टेक्नॉलॉजिस्, केहीन फाय प्रा.लि., एसीजी कॅरेस फाउंडेशन, प्रीव्ही ऑर्गनिक्स लि., एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजिस लि., महाड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन या कंपन्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
या समारंभाला रावसाहेब बढे, रोटरी क्लब डिस्ट्रिक्ट 3131 चे अभय गाडगीळ, रोटरी क्लब ऑफ निगडीच्या अध्यक्षा डॉ. शुभांगी कोठारी, रोटरी क्लब ऑफ पिंपरीच्या अध्यक्ष डॉ. विभा झुत्शी उपस्थित होत्या. रोटरी क्लब ऑफ निगडी आणि रोटरी क्लब ऑफ पिंपरीने या समारंभाचे संयोजन केले होते. पुरस्कार प्राप्त करणार्या कंपन्या व संस्थांच्या अधिकार्यांनी असा उपक्रम राबवल्याबद्दल रोटरीचे आभार मानले.
कंपन्यांना प्रोत्साहन मिळावे, त्यांनी केलेल्या पाणी विषयक कार्याचे इतरांना ज्ञान व्हावे. तसेच संशोधक आणि व्यावसायिक अभियंत्यांना नवीन व्यवसायाच्या संधी मिळाव्या, हा प्रमुख उद्देश हा पुरस्कार देण्यामागचा होता. यापुढेही रोटरीच्या वतीने विधायक कार्य करणार्या संस्थांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केले जाईल. पाणी बचतीसाठी रोटरीचा सदैव पुढाकार राहिला आहे.
-सतीश खाडे, पुरस्काराचे संयोजक