विश्वासराव देवकाते यांचे मत : दौंडमध्ये पाणी टंचाईबाबत बैठक
दौंड : महाराष्ट्रात 1972 च्या दुष्काळापेक्षा भयानक परिस्थिती निर्माण होणार आहे. तेव्हा पाण्याचे नियोजन करणे काळाची गरज आहे. एकवेळेस अन्न मिळेल, पण पाणी मिळणे कठीण होईल. तेव्हा अधिकार्यांनी भ्रमात राहू नये, अन्यथा मोठ्या दुष्काळाला सामोरे जावे लागेल, असे मत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांनी व्यक्त केले.दौंड येथे पार पडलेल्या पाणी टंचाई बैठकीत ते बोलत होते. शासकीय अधिकार्यांनी दुष्काळाच्या संदर्भात चालढकल केली, तर कुठल्याही अधिकार्याला पाठीशी घातले जाणार नाही, असा आदेशच देवकाते यांनी यावेळी दिला. या बैठकीत टंचाई आराखड्याबाबत तालुकापातळीवर नियोजन आणि समन्वय नसल्यामुळे वरिष्ठांनी नाराजी व्यक्त केली. पंचायत समितीचे उपसभापती प्रकाश नवले यांनी खडकी येथील बंधारा वाहून गेल्याची खंत व्यक्त केली. या कामाची मी पाहणी करणार आहे. दोषी व्यक्तींवर कारवाई केली जाईल, असे देवकाते यांनी सांगितले.
…तर टँकरची मागणी घटेल
पंचायत समितीच्या माध्यमातून टँकर कमी करण्यासाठी आणि पाणीटंचाई भासणार नाही याचे नियोजन केले जाईल, अशी हमी गायकवाड यांनी दिली. पाण्याच्या नियोजनाबरोबरीने जनावरांच्या चार्याचा प्रश्नदेखील महत्त्वाचा आहे. त्यासाठी चारा छावण्यांचे नियोजन करणे गरजेचे आहे. पाटबंधारे खात्याने पाण्याचे नियोजन केल्यास टँकरची मागणी घटेल, असे उपसभापती प्रकाश नवले यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गटविकास अधिकारी गणेश मोरे यांनी टंचाई बैठकीचा आढावा घेऊन तालुक्यातील टंचाईची परिस्थिती स्पष्ट करून यावर योग्य ते नियोजन केले जाईल, असे सांगितले. या वेळी तहसीलदार बालाजी सोमवंशी, पुणे जिल्हा महिला बालकल्याण समितीच्या राणी शेळके, जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण सातपुते, गणेश कदम, सारिका पानसरे, पंचायत समिती सदस्या ताराबाई देवकाते यांच्यासह विविध शासकीय अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.
उन्हाळ्यात बांधलेला बंधारा वाहून गेला
टंचाई बैठकीत उपसभापती प्रकाश नवले म्हणाले की, खडकी येथे बंधार्याच्या खोलीकरणासाठी माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी खासदार फंडातून 26 लाख आणि 14 लाख रुपये बंधारा उभारण्यासाठी निधी दिला. त्यानुसार उन्हाळ्यात बंधारा बांधला गेला आणि पावसाळ्यात कॅनॉलच्या पाण्याने अगदी तीन महिन्यांतच बंधारा वाहून गेला. जर हा बंधारा टिकला असता तर परिसराला पाण्याची टंचाई भासली नसते.
मजुरांना रोजगार द्या
पुणे जिल्ह्याची स्थापना झाल्यापासून पहिल्यांदाच नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यात 50 टँकर सुरू झाले, ही गंभीर बाब आहे. त्यातच दौंड तालुक्यात 9 टँकर सुरू आहेत. तेव्हा टँकर कमी करण्यासाठी योग्य ते नियोजन झाले पाहिजे. जनावरांच्या चार्याचा प्रश्न सुटला पाहिजे आणि याचबरोबरीने दुष्काळी परिस्थितीत रोजगारांना मजुरी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.
20 टक्के गावे टंचाईग्रस्त
टँकरने पाणी देत असताना पाण्याची गुणवत्ता तपासून घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबरीने टँकरच्या फेर्या वेळेवर होतात की नाही, याचीदेखील नोंद ग्रामस्थांनी आणि लोकप्रतिनिधींनी घ्यावी, असे मांढरे यांनी पुढे सांगितले. तालुक्यातील टँकर मंजुरीचे अधिकार स्थानिक पातळीवर तहसीलदारांना दिले पाहिजेत. त्यानुसार पाणीटंचाई कमी होण्यास मदत होईल किंबहुना टंचाईचे नियोजन होणे काळाची गरज असल्याचे जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे यांनी सांगितले. तालुक्यातील 80 टक्के गावे पाण्याखाली आहेत, तर 20 टक्के गावे टंचाईग्रस्त असल्याचे सभापती झुंबर गायकवाड यांनी सांगितले.