पाण्याच्या टाकीची झाली कचराकुंडी

0

देहूरोड । मामुर्डी येथील कॅन्टोन्मेंटच्या शाळेजवळ एका कामासाठी ठेकेदाराने पाण्याची टाकी आणली होती. अनेक दिवस झाले ती पडून आहे. या टाकीचा उपयोग नागरिक कचराकुंडीप्रमाणे करू लागले आहेत. त्यात आता मेलेले कुत्रे आणि कचरा ओसंडून वाहत आहे. या प्रकाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे गेले आठ दिवस बरलोटानगर वसाहतीतील नागरिकांना प्रचंड दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याची तक्रार करण्यात आली आहे.

परिसरात घाणीचे साम्राज्य
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मामुर्डी येथील शाळेजवळ एका ठेकेदाराचे काम सुरू होते. काम झाल्यानंतर या ठिकाणी ठेवलेली पाण्याची टाकी हटविणे आवश्यक होते. मात्र, अनेक दिवस ती तेथेच पडून आहे. आसपासच्या नागरिकांनी या टाकीचा वापर चक्क कचराकुंडीसारखा सुरू केला आहे. कचर्‍याने भरलेली ही टाकी ओसंडून वाहत आहे. असे असतानाच चार दिवसांपुर्वी कुणीतरी त्यात मेलेले श्‍वान टाकले. त्यामुळे या भागात दुर्गंधी पसरली असुन नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असल्याची तक्रार राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्ष राजश्री राऊत यांनी केली आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष
प्रशासनाच्या संबंधित कर्मचार्‍यांना अनेकवेळा सांगूनही या प्रकाराकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न उद्भवल्यास प्रशासनाला जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. या संदर्भात बोर्डाचे कार्यालय अधिक्षक श्रीरंग सावंत यांना यासंदर्भात विचारले असता अशी कुठलीही तक्रार आली नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, असा प्रकार गंभीर असून तातडीने यावर कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.